विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती आपल्यासमोर आहे. त्याने होणारा त्रास, पाळावे लागणारे नियम हे आपल्याला माहीत आहेत, आणि याबाबत वेळोवेळी जनजागृती देखील केली जाते. तरीही काहीजण हे नियम पाळताना दिसत नाहीत, आणि मग त्याचा फटका त्यांच्यासह इतरांना देखील बसतो. हे इतकं सगळ सांगण्याचं कारण म्हणजे, अभिनेत्री सारा अली खानचा नुकताच व्हायरल झालेला व्हिडीओ.
सारा आणि तिचा भाऊ इब्राहीम अली खान हे दोघे बाहेर गेले असताना एका चाहत्याने मास्क काढलेला तिला दिसला. त्यावर तिने त्या चाहत्याला चांगलंच झापलं. बाहेरची परिस्थिती माहीत असतानाही तुम्ही असं कसं वागू शकता? तुम्ही असं करता कामा नये, असं साराने त्या चाहत्याला सुनावलं. साराचा हा व्हिडीओ पापाराझी फोटोग्राफरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
निळ्या रंगाच्या या शॉर्ट ड्रेसमधील सारा या व्हिडीओमध्ये एकदम कूल दिसते आहे. ती आणि तिचा भाऊ इब्राहीम या दोघांनीही कोरोनाच्या सगळ्या नियमांचे पालन केलेले दिसते आहे.
साराने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा आणि जान्हवी कपूरचा वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडीओत साराने तिची ट्रेनर नम्रता पुरोहित हिलाही टॅग केले आहे. जस्टीन बीबरची गाणी ऐकत तिचा हा वर्कआऊट सुरू आहे.
आनंद एल रॉय यांच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटात लवकरच सारा झळकणार आहे. यात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुषही आहेत. यापूर्वी ती वरूण धवनसोबत अभिनेता गोविंदाच्या ‘कुली नं. १’ च्या रिमेकमध्ये दिसली होती. ऍमेझॉन प्राईम या डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट गेल्या वर्षी ख्रिसमसमध्ये प्रदर्शित झाला होता.