इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या भरधाव ऑडीने नागपूरच्या रामदासपेठेत एका दुचाकीसह चार ते पाच वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्ये नसल्याचे सांगण्यात आले. पण, आता या प्रकरणावरुन शिवसेने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, चंद्रशेखर बाबनकुळेंच्या मुलाने सहा गाड्या उडवल्या यातील दोन जखमींची प्रकृती गंभीर आहे.
या घटनेबाबत बोलतांना राऊत म्हणाले की, तो कोणत्या पार्टीचा आहे याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही. चंद्रशेखर बाबनकुळे यांचा मुलगा असो किंवा कुठल्याही नेत्याचा असो या राज्यात दोन कायदे आहेत का? महाराष्ट्रात हिट अँण्ड रनच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. हे मोठ्या बापाचे मुलं नशेत धुंद होऊन कोणालाही रस्त्यात उडवतात. या मोठ्या बापाच्या मुलांचे एफआयआरमध्ये नावही येत नाही. या राज्यात जर कायदा एक आहे तर फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांनी नागपूरमधील हिट अँण्ड रन केस बाबत बोलायला हवे.
गाडाने सहा गाड्यांना ठोकर मारली. चार लोक जखमी आहेत. दोन लोक अत्यंत गंभीर स्वरुपात जखमी आहेत. लाहोरी बारमधून नशेत धुंद होऊन हे लोक गाडीत बसले आणि गाडी चालवत गेले. गाड्या ठोकल्या, सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले आहेत. त्यानंतर गाडीची नंबर प्लेट काढून टाकली. युवराज स्वत. गाडी चालवत होते. पण, अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवले असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.