नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे (नागपूर ते शिर्डी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या मार्गामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होत आहे. मात्र, या महामार्गावर अपघातांचीही मालिका सुरु झाली आहे. एकट्या बुलढाणा जिल्ह्यातच पाच दिवसांमध्ये पाच ठिकाणी अपघात झाले आहेत.
समृद्धी महामार्गाच्या सुरुवातीलाच म्हणजे वायफळ टोलनाक्याजळच हा पहिला अपघात झाला. एका कारला मागून येणाऱ्या भरधाव कारने टोलनाक्याजवळ धडक दिली. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळाकडे धाव घेतली.धडक देणाऱ्या कारचा समोरच्या बाजूचा चक्काचूर झाला. त्यानंतर मेहकर बेलगाव येथील डोणगाव हद्दीतील अपघाताची दुर्घटना झाली. कारण गॅस सिलिंडरने भरलेला हा ट्रक होता ,त्यामुळे ट्रक उलटल्यावर कुठलीही मोठी दुर्घटना होऊ शकली असती, सिलिंडरचा स्फोट होऊ शकला असता मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आणि या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र सतत होणारे हे अपघात मात्र चिंतेची बाब असल्याचे समोर येत आहे.
नेमके हे अपघात का होता आहेत, अपघाताची नेमकी कारणे काय आहेत? याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. वास्तविक विदर्भ आणि मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात समृद्धी येईल, असं म्हटले जात आहे. पण याठिकाणी १२० किमी प्रतितासाची वेग मर्यादा असल्यानं यावर फक्त याच वेगात वाहने चालविण्याची मुभा आहे. अतिशय सरळ रेषेत हा महामार्ग असल्याने आणि गुळगुळीत रचना असल्यामुळे वाहन चालकाला आपण निर्धारित वेग मर्यादेच्या पलीकडे गेलो, हे लक्षातच येत नाही. त्यामुळे या महामार्गावर गेल्या पाच दिवसात अनेक अपघात झाले.
केवळ पाच दिवसांत फक्त बुलढाण्यातच पाच अपघात झाले आहेत. मालवाहू ट्रक अनियंत्रित होऊन मेहकरजवळ महामार्गावरील कठड्यावर आदळून पलटी झाला, चालक जखमी झाला. पुन्हा त्यानंतर १२ डिसेंबरलाच एक गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन महामार्गाच्या खाली खोल खड्ड्यात उलटला, चालक आणि वाहक जखमी झाले. पुन्हा १५ डिसेंबर रोजी रात्री एक कार शिर्डीहून अमरावती कडे जात असताना चालकाला झोप लागल्याने कठड्याला धडकून अपघात झाला, यात बाळांसह तिघे गंभीर जखमी झाले.
त्यानंतर १६ डिसेंबरला दोन वेगवेगळे झाले .पहिला अपघात हा एक कार औरंगाबादहुन मेहकरकडे जाताना रस्त्यावर अचानक कोल्हा आला आणि कार अनियंत्रित होऊन अपघात झाला, दोन गंभीर जखमी, एकजण किरकोळ जखमी झाला. तर याच दिवशी दुसरा अपघात मुंबईहून एक कार वर्धा कडे जाताना मेहकर नजीक चालकाला झोप आल्याने कार कठड्याला धडकून अपघात , चालक गंभीर जखमी झाला.
समृद्धी महामार्ग सरळ रेषेत असल्याने आणि वाहन चालवताना वाहन चालकाला तंद्री लागण्याची अवस्था निर्माण झाल्याने चालकाला आपण किती वेगात जातो, याचे भानच राहत नाही, त्यामुळे अचानक झोप किंवा डुलकी लागू शकते. असे प्रकार या महामार्गाच्या रचनेमुळे होत आहेत. शिवाय अचानक महामार्गावर जंगली प्राणी येणे आणि त्यामुळे वाहनावरचं नियंत्रण सुटणे अशा अनेक कारणाने महामार्गावर अपघात होत आहेत.
देशातील वाढत्या वाहन अपघातांबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः वाहनचालकांमध्ये वाहन चालविताना जनजागृती हवी, तसेच वाहनांची योग्य दुरुस्ती व वेळोवेळी देखभाल देखील व्हायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या देशातील वाहन चालकांमध्ये पाहिजे तशी जागृती झालेली नाही. त्यामुळे यापुढे समृद्धी महामार्गावरून वाहन चालवतानाच मोठी जनजागृती करणे आवश्यक आहे, असे म्हटले जात आहे.
Samruddhi Mahamarga Highway Accidents
Nagpur Mumbai