समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात व प्रतिबंधात्मक उपाय
– डॉ. शैलेंद्र गायकवाड , नाशिक
अडथळेमुक्त गतीमान प्रवासाच्या उद्देशाने बनविलेला समृद्धी महामार्ग मागील काही महिन्यांपासून वाढत्या अपघातांमुळे चर्चेत आलाय. या वाढत्या अपघातांच्या अनेक कारणांपैकी “रोड हिप्नोसिस“ हे एक महत्त्वाचे कारण पुढे आले आहे.
“ रोड हिप्नोसिस “ समजून घेण्याआधी “ हिप्नोसिस “ म्हणजे नेमकं काय आणि ते घडते कसे हे समजून घेणे गरजेचे आहे. हिप्नोटिक ट्रान्स किंवा समोहनावस्था म्हणजे आपले तर्कवितर्क करू शकणारे बाह्यमन किंवा जागृत मन निष्क्रिय होणे किंवा झोपी जाणे. रोज नैसर्गिक झोपेत हेच घडत असते. मात्र संमोहन प्रक्रियेत हे जाणीवपूर्वक घडविले जाते. ते कसे केले जाते ते समजून घेऊया.
सामान्यतः जागेपणात जागृत मन आपल्या पंचज्ञानेंद्रियांद्वारा येणाऱ्या माहितीला सतत तर्कवितर्क करून अंतर्मनात पाठवत असते. म्हणून अंतर्मनावर एक प्रकारे जागृत मनाचे नियंत्रण राहते. परंतु जर जागृत मनाकडे एकाच प्रकारची सूचना किंवा माहिती परतपरत येत राहिली किंवा ती जर एकसूरी राहिली तर त्याच त्याच माहिती किंवा सूचनेवर जागृत मन तर्कवितर्क करणे सोडून देते आणि ते निष्रिय व्हायला लागते. फॉर्मल हिप्नोसिस प्रक्रियेत संमोहनकर्ता संबंधित व्यक्तीला तिचे अवधान किंवा लक्ष एका विशिष्ट बिंदूवर / वस्तूवर केंद्रित करायला लावतो व मौखिक सूचना देतांना सुद्धा एकच सूचना पून्हा पून्हा एकसूरी आवाजात रिपीट करतो, ज्यामुळे व्यक्तीचे जागृत मन निष्क्रिय होऊन व्यक्ती संमोहनावस्थेत जाते.
आता समृद्धी महामार्गावर होणारे रोड हिप्नोसिस कसे घडते हे समजणे सोपे होईल. महामार्गावर प्रवास करतांना दूरदूर पर्यंत डोळ्यांना पर्यायाने जागृतमनाला एकसूरी पणा दिसत राहतो. शिवाय रस्त्यावर असणारे पांढरे पट्टे या एकसूरी पणात भर टाकतात. जागृतमनाला जागे राहण्यासाठी चालना मिळणारी विविधता कुठेही दिसत नाही, त्यामुळे ते क्षीण किंवा निष्क्रिय होऊन चालकाला संमोहनावस्था येते आणि त्या ट्रान्समध्ये गाडीवरचे नियंत्रण सुटून अपघात होतात.
समृद्धी किंवा इतर कोणत्याही लांब पल्ल्यावर होणाऱ्या रोड हिप्नोसिसला कारणीभूत असलेल्या एकसूरी पॅटर्नला खंडीत करण्यासाठी काही योजना केल्यास अपघात टाळता येऊ शकतील. जसे रस्त्याच्या कडेला अंतराअंतरावर झाडे लावणे. ती सुद्धा एकाच प्रकारची नको, विविध प्रकारची, वेगवेगळ्या आकाराची असावीत. त्यामुळे चालकाला गाडी चालवतांना वेगवेगळे दृश्य दिसून जागेपणासाठी चालना मिळत राहील. आपण जेव्हा जंगलात किंवा घाटात गाडी चालवतो तेव्हा प्रवासातील समोर येणारे वेगळेपण प्रवास आनंदी आणि सजग ठेवतो. शिवाय अजून एक उपाय करता येईल. महामार्गावर ठराविक अंतराने जागृत मनाला चालना देणारे सचित्र बोर्ड्स लावले तरी प्रवासाचा एकसूरीपणा घालवायला मोठी मदत होईल.
रोड हिप्नोसिसमध्ये अप्रत्यक्ष भर टाकणाऱ्या अजून काही गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात. झोप पूर्ण न करता गाडी चालवणे किंवा नैसर्गिक झोपेचा आवेग जेव्हा अत्यंत तीव्र असतो त्यावेळी गाडी चालविण्याचा अट्टहास करणे. तसेच दारू किंवा गुंगी आणणाऱ्या पदार्थांनी नशा करून गाडी चालविणे.
थोडक्यात अशा सर्व गोष्टी ज्या चालकाच्या जागृत मनाच्या तर्कवितर्क करण्याच्या क्षमतेला चालना देऊन रंजकता किंवा विविधता टिकवण्यासाठी अंमलात आणल्या तर समृद्धी महामार्ग किंवा इतर सर्व दिर्घ पल्ल्याचे महामार्ग अपघातमुक्त,आनंददायी प्रवासासाठी आणि खऱ्या अर्थाने राष्ट्राच्या प्रगतीचे कारक घटक म्हणून ओळखले जातील.
लेखक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संमोहनतज्ञ आहेत. तसेच डॉ.रविंद्र कुमार सिंगल (IPS) यांच्या मार्ददर्शनाखाली राबवल्या जाणाऱ्या रोड सेफ्टी व विविध सामाजिक उपक्रमांमधील सक्रिय कार्यकर्ते आहेत.
Samruddhi Highway Accident Solutions