इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राज्यातील राजकारण एकहाती फिरवण्याची ताकद असलेल्या शरद पवार यांनी काही दिवसांपासून राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती. २ मे रोजी त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कार्यकर्ते, नेते यांनी त्यानंतर अक्षरशः गोंधळ घातला. त्याचे पडसाद चांगलेच उमटले. आणि अखेर कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी आपण राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा शरद पवार यांनी शुक्रवार, ५ मे रोजी केली. आणि या राजीनामा नाट्यावर अखेर पडदा पडला. पण, या सगळ्यात एका व्यक्तीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली ती म्हणजे सोनिया दुहान. त्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत.
‘लोक माझे सांगाती’ या आपल्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी शरद पवार यांनी ही घोषणा केली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांपैकी अजित पवार सोडले तर अन्य सगळ्या नेत्यांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती केली. कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या भावनांचा आदर करत शरद पवार यांनी राजीनामा मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. या पत्रकार परिषदेत त्यांच्या मागे बसलेल्या पिवळ्या कुर्तीतील महिलेची चर्चा सुरू झाली. पहाटेचा शपथविधी मोडून काढण्याचे श्रेय मोठ्या प्रमाणावर त्यांनाही जाते.
सोनिया दुहान आहे कोण?
सोनिया दुहान या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आहेत. सोनिया यांनी २०१९ मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीवेळी राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचे काम केलं होतं. अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आमदार नॉट रिचेबल होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०१९ मध्ये बंडखोरी झाली होती. या गोष्टींशी सोनिया दूहन यांचा संबंध आहे. सोनिया दूहन यांनी २०१९ मध्ये हरियाणातील गुरुग्राममधून राष्ट्रवादीच्या आमदारांची सुटका केली आणि अजित पवार गटासह भाजपचे महाराष्ट्रात सरकार स्थापनेचे स्वप्न मोडले होते. भाजपाच्या गळाला लागलेल्या या आमदारांना परत आणण्याचं काम अत्यंत नाट्यमय पद्धतीने सोनियांनी केलं होतं.
शिंदे गटाच्या बंडखोरीशी देखील कनेक्शन
शिंदे गट बंडखोरी करून सुरतपासून गुवाहाटी आणि नंतर गोव्याला गेला तेव्हा सोनिया दुहान या त्यांच्या मागावर होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही आमदारांशी संपर्क साधण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी झालेही होते. मात्र उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आणि भाजपच्या गोटातून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा झाल्यानंतर ही बंडखोरी रोखण्याचे प्रयत्न फोल झाले. या दोन्ही प्रयत्नांमुळे राष्ट्रवादीची ‘लेडी जेम्स बाँड’ अशी ओळख सोनिया दुहान यांची आहे.
Maharashtra Politics Sonia Doohan Lady Jems Bond