छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडी सरकारच्या काळात औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्यात आले होते. परंतु त्यानंतर आलेल्या शिवसेना-भाजप युती सरकारने संदर्भातील अध्यादेश मागे घेऊन पुन्हा एकदा या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे केले होते. त्यापूर्वी अनेक वर्षांपासून शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला संभाजीनगर असे म्हटल्यापासून हा नामांतराचा प्रश्न वारंवार चर्चिला जात होता. परंतु छत्रपती संभाजीनगर असे या शहराचे नाव झाल्यानंतर देखील आता पुन्हा एकदा कोर्टाने या संदर्भात काही निर्देश दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या निर्देशाची पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
औरंगाबाद नामांतराचा मुद्दा कायम चर्चेत आहे. दरम्यान अशातच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी उच्च न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने ‘औरंगाबाद’ हेच नाव लिहावे, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर नामांतराला मंजुरी मिळताच काही शासकीय कार्यालयांनी या नावाची अंमलबजावणी सुरु केली होती. मात्र उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने औरंगाबाद नावात बदल न करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशाचे काटेकोर पालन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी सर्व कार्यालयप्रमुख, विभागप्रमुखांना दिले आहेत. तर याबाबत पाण्डेय यांनी आदेश देखील काढले आहेत.
या शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यासाठी केंद्र शासनाने मंजुरी दिल्यानंतर अनेक ठिकाणी बदललेल्या नावाचा उल्लेख सुरु झाला आहे. तर काही शासकीय कार्यालयांनीही कार्यालयांच्या नामफलकात नवीन नावाने बदल केला आहे. खाजगी दुकानांनी तर यापूर्वीच आपल्या पाट्या बदलून घेतल्या आहेत. दरम्यान नामांतराबाबत प्राप्त झालेल्या आक्षेपांची सुनावणी चालू असताना महसूल व इतर विभागांशी संबंधित कार्यालये जिल्ह्याचे नाव बदलत असल्याची बाब याचिकाकर्ते व त्यांच्या विधिज्ञांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने औरंगाबाद नावात बदल न करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.
याबाबत आता न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय जिल्ह्यातील सर्व कार्यालयप्रमुख व विभाग प्रमुखांना कार्यालयीन आदेश जारी केले आहेत. त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या अनुषंगाने उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका दाखल झाली आहे.
नामांतराबाबत प्राप्त झालेल्या आक्षेपांची सुनावणी चालू असताना महसूल व इतर विभागांशी संबंधित कार्यालये जिल्ह्याचे नाव बदलत असल्याची बाब याचिकाकर्ते व त्यांच्या विधिज्ञांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने औरंगाबाद नावात बदल न करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.
Sambhajinagar Aurangabad Collector Order