नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर औद्योगिक वसाहतीतील बीसीएल फोर्जिंग कारखान्यातील कामगारांच्या बँक खात्यात त्यांच्या थकीत वेतनाच्या फरकातील पहिला हप्त्याची रक्कम जमा झाली आहे. तब्बल १० वर्षानंतर ऐन दिवाळीत थकीत वेतनाची रक्कम पदरी पडल्याने अंधारमय झालेल्या कामगारांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने दिवाळी प्रकाशमय झाली आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीत बीसीएल फोर्जिंग नावाने कारखाना होता. कारखान्यात चार चाकी वाहनांसाठी लागणारे फोर्जिंगची कामे केली जात होती. महिंद्रा अँड महिंद्रा, महिंद्रा सोना, टाटा, कायनेटिक यासह ऑटोमोबाईल सेक्टरमधील विविध कारखान्यांना या कारखान्यामार्फत कच्या मालाचा पुरवठा केला जात होता. कारखान्यात ३०० हून अधिक कंत्राटी कामगारांसह कायम कामगार काम करत होते. कामगारांनी सुरुवातीला ठाणे येथील आर जे मेहता यांच्या कामगार सभेचे नेतृत्व स्वीकारले होते. त्यानंतर दिवंगत डॉ.वसंत पवार यांच्या राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे नेतृत्व स्वीकारले. त्यानंतर चांदबिबी जैदि यांच्या अखिल भारतीय कामगार मजदूर सभेचे नेतृत्व स्वीकारले. दरम्यान, जुलै २०१२ मध्ये व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे कंपनी बंद पडली. बंद पडलेल्या अवस्थेत कामगारांनी व्यवस्थापना विरोधात आंदोलन पुकारत माजी उद्योग मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्या समर्थ कामगार सेनेचे नेतृत्व स्वीकारले.
या सर्व युनियनकडून भ्रमनिरास झालेल्या कामगारांनी अखेर कोणी वाली नसताना हातात लालबावटा घेत सिटूचे नेतृत्व स्वीकारले. सन २०१२ मध्ये बंद पडलेल्या कंपनी कामगारांनी सिटूच्या नेतृत्वाखाली लढा सुरू केला. दरम्यान, तब्बल दहा वर्ष न्यायालयीन लढा देत सिटूने कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. थकित वेतनाचा पहिला हप्ता कामगारांच्या बँक खात्यात जमा झाला असून पुढील हप्तेही हळूहळू बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी एल कराड यांनी दिली. कामगारांच्या वतीने कमिटी मेंबर सुधाकर आव्हाड, संजय भामरे, श्याम पवार, बी. आर. पाटील, अशोक चव्हाण, माधव कानकाटे आदींनी काम बघितले. दहा वर्षानंतर रक्कम हाती पडल्याने कामगारांनी सिटूचे आभार मानले असून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली.