पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यात मुख्यालय असलेली रुपी सहकारी बँक लिमिटेड येत्या २२ सप्टेंबरपासून बँकिंग व्यवसाय बंद करणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने आदेश जारी करून रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार २२ सप्टेंबर पासून रुपी बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार बंद होतील. सहकार आयुक्त आणि महाराष्ट्र सहकारी संस्थांच्या निबंधकांनाही बँक बंद करण्याचे आदेश जारी करून त्यासाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंती करण्यात आली आहे. रुपी बँकेच्या ३५ शाखा राज्यभरात आहेत. २००३ पर्यंत बँकेची स्थिती चांगली होती. २००३ मध्ये पहिल्यांदा रिझर्व्ह बॅंकेने काही निर्बंध लादले. २००५ मध्ये ते परत काढूनही घेण्यात आले. पूर्वीच्या बॅंकेच्या संचालक मंडळाला निवडणूक लढण्याची परवानगी दिली नाही. आता महाराष्ट्रात या बँकेला कायमस्वरुपी कुलूप लागणार आहे.
रिझर्व्ह बँक सहकारी व अन्य बँकांसाठी नियम जाहीर करते. एखाद्या बँकेत अनियमितता आढळल्यास त्यांना दंड लावते. मात्र बँकेच्या ताळेबंदात मोठा फरक आढळल्यास आणि अनियमितता जास्त असल्यास अशा बँकांना ग्राहक हितासाठी बंद करण्यात येते. रुपी बँक सुद्धा त्यापैकीच एक आहे. यापूर्वीही अनेक बँका, वित्तीय संस्थांचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आला आहे.
२२ सप्टेंबरपासून रुपी बँकेच्या सर्व सेवा कायमस्वरुपी बंद होणार आहेत. ज्या ग्राहकांचा अथवा मित्र, नातेवाईक, हितचिंतकांचा पैसा या बँकेत अडकला असेल, त्यांच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. मात्र सध्या रुपी सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नसून कमाईचे आवश्यक साधनेही नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या बँकेचे कामकाज बंद झाल्यावर ग्राहकांना रक्कम काढता येणार नाही. कोणताही आर्थिक व्यवहार, धनादेश वा इतर सेवांचा लाभ घेता येणार नाही.
सगळ्या सहकारी बॅंका डबघाईला येण्यामागची काही कारणे असतात तीच रुपी बॅंकेच्या बाबतीतही झाले. बुडीत कर्ज वाढल्याने बॅंक अडचणीत आली. याचाच परिणाम असा झाला की, कर्ज वसुली होऊ शकली नाही आणि बॅंकेकडे भांडवल राहिले नाही. जेव्हा बॅंकेकडे तरलता राहत नाही तेव्हा रिझर्व्ह बॅंक ठेवी काढण्यावर बंधने आणते. म्हणून रिझर्व्ह बॅंकेने रुपीवर निर्बंध आणले. त्यात सुरुवातीला ५ हजार रुपये काढायला परवानगी होती. नंतर १ हजार काढायला परवानगी होती. नंतर ती पूर्ण बंद केली. कारण केंद्रीय बँकेच्या नियमांनुसार, बँकिंग विनियमन अधिनियम यांचेही पालन करण्यात या बँकेने टाळाटाळ केली.
Rupee Bank will Closed from 22 September 2022
RBI Reserve Bank of India