मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – मुख्यमंत्री साहेब आठवतंय का ? मी सभागृहात गणवेशाच्या गुणवत्तेसंदर्भात प्रश्न केले असता तुम्ही माझी चेष्टा केली होती. माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण आता या गोरगरीब विद्यार्थ्यांची तरी चेष्टा करू नका…..अन्यथा नियती अशी चेष्टा करेल की या गणवेशाप्रमाणे महायुतीची राजकीय अवस्था वर-खाली झाल्याशिवाय राहणार नाही अशी पोस्ट सोशल मीडियावर आमदार रोहित पवार यांनी टाकली आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, सभागृहात गणवेश दाखवताना “रोहित quality बघ” असं तुम्ही म्हणाला होतात, आता हे गणवेश बघून हीच का महायुती सरकारची quality? हा प्रश्न पडतो. तुम्ही माझी चेष्टा करत असताना आजूबाजूला बसून दात काढणारे नेते आज गप्प का . गणवेश देण्याच्या नावाखाली गुजरातमधून कापड आणून दलाली खाऊन स्वतःचे खिसे भरून घेणाऱ्या सरकारचा हिशोब करण्याची वेळ आता जवळ आली आहे आणि जनता हा हिशोब चुकता करेलच.
अंबादास दानवे यांची टीका
या चिमुकल्याने घातलेला गणवेश प्रतिबिंब आहे, महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे! पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्ट ला.. काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा शिक्षण मंत्री @dvkesarkar जी. विद्यार्थी हा प्रयोगशाळेत शिकावा, तुम्ही तर त्याचीच प्रयोगशाळा करून ठेवली आहे. १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत ४५ लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपला तरी केवळ २४ लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिले गेले आहेत. ते ही हे असले बोगस! कपड्याचा धड दर्जाही पाळण्यात आलेला नाही, न शिवण धडाची! हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्या आहेत. त्यातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेशही सुटलेले नाहीत. अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनतेे अंबादास दानवे यांनी केली आहे.









