इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
तिच शैली, तोच आवाजाचा भास व्हावा असे भाषण ज्युनिअर आर. आर यांनी केले. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात हे भाषण बघून सर्वच भारावून गेले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडलेल्या विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदन ठरावाच्या चर्चेत आबाचे सुपुत्र आमदार रोहित पाटील यांनी सहभाग घेतला. त्यावेळी सर्व सभागृह शांत होते.
यावेळी रोहित पाटील म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा जसा मान पटकावला आहे, तसाच महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार होण्याचा मान मी पटकावला आहे. त्यामुळे माझ्यासारख्या सर्वात तरुण विधीमंडळ सदस्याकडे आपले बारीक लक्ष असेल, अशी अपेक्षा रोहित पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे व्यक्त केली.
महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी विरोधी पक्षाकडून ज्या काही मागण्या येतील त्या सर्व मागण्या अध्यक्ष म्हणून आपण पूर्ण करावी, अशी विनंती देखील रोहित पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना केली. विधिमंडळाच्या आश्वासन समितीसारख्या इतरही समित्यांवर अध्यक्ष म्हणून आपण वचक ठेवाल, अशी अपेक्षा त्यांनी सभागृहात व्यक्त केली. तसेच तरुणांना अभिप्रेत असलेले चांगले कायदे सभागृहात तयार व्हावे, अशी सूचना आमदार रोहित पाटील यांनी सभागृहाला केली.