मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इतिहासाचा पाचवा खंड प्रसिद्ध झाला आहे. या खंडामध्ये सन 1997 ते 2008 या 11 वर्षांच्या कालावधीचा समावेश आहे. या खंडासह, भारतीय रिझर्व्ह बँकेचा इतिहास आता 2008 पर्यंत अद्ययावत करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने 2015 मध्ये हा खंड तयार करण्याची प्रक्रिया माजी खासदार आणि रिझर्व्ह बँकेचे माजी प्रमुख सल्लागार आणि मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीच्या स्थापनेद्वारे करण्यात आली. आर्थिक इतिहासकार डॉ. तीर्थंकर रॉय यांच्या नेतृत्वाखालील लेखकांच्या चमूने हा खंड तयार केला आहे. या समितीमध्ये के. कनगसबापथी, एन. गोपालस्वामी, एफ.आर. जोसेफ आणि एस.व्ही.एस. दीक्षित यांचा समावेश होता.
प्रतिकूल परिस्थितीवर मात
नाशिकचे भूमीपुत्र असलेले, सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेले नामवंत अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, मराठी व इंग्रजीतले सिद्धहस्त लेखक तसेच एक प्रसन्न प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून डॉ. नरेंद्र जाधव सर्वांना सुपरिचित आहेत. एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्रतिकूल परिस्थितीवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने निग्रहाने मात करीत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा चौफेर क्षेत्रात अभ्यासू व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक आहे. रसाळ वक्तृत्व शैली, चैतन्यमयी व्यक्तिमत्व, सकारात्मक चिंतनातून प्रबोधन करणारे वक्ते म्हणून डॉ.जाधव यांनी नावलौकिक संपादन केला आहे.
https://twitter.com/DrJadhav/status/1511684733234991105?s=20&t=SQhi0tOiQHxkpJq8rlN0JA
अर्थजगतात योगदान
मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम.ए.मध्ये प्रथम वर्ग मिळविणारे डॉ.जाधव पहिलेच दलित विद्यार्थी ठरले. 1986 साली अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठातून ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी’ म्हणून विशेष बहुानासह अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदवी त्यांना बहाल करण्यात आली. डॉक्टरेट करीत असताना इंडियाना आणि डिपॉ या दोन विद्यापीठात अध्यापन करून विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांना गौरविण्यात आले. अमेरिकेत डॉक्टरेट मिळाल्यानंतर अनेक संधी उपलब्ध असतानाही मायभूमीचे ऋण फेडण्यासाठी ते एका आठवड्यातच भारतात परतले. चार राज्यातील विद्यापीठांनी त्यांना ‘डॉक्टर्स ऑफ लेटर्स’ ही सन्माननीय पदवी प्रदान केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियात अधिकारी म्हणून 1974 ते 1977 अशी तीन वर्षे त्यांनी सेवा केली आणि 1977 पासून रिझर्व्ह बँकेत अर्थतज्ज्ञ म्हणून तब्बल 31 वर्षे नोकरी केली. रिझर्व्ह बँकेचे प्रधान आर्थिक सल्लागार आणि प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून कार्यकारी संचालकाच्या पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. भारतीय अर्थकारण आणि आर्थिक धोरणांच्या संदर्भात गेली कित्येक वर्षे ते महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
इतिहासाची ठळक वैशिष्ट्ये
केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केलेल्या खंडामध्ये रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत नोंदी, प्रकाशन आणि त्या कालावधीत रिझर्व्ह बँकेच्या कामकाजाशी जवळून संबंध असलेल्या व्यक्तींशी झालेल्या मौखिक चर्चेच्या आधारे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेचा संस्थात्मक इतिहास यात आहे. या खंडात जागतिक अर्थव्यवस्थेतील दोन प्रमुख संकटे म्हणजे आशियाई आर्थिक संकट आणि जागतिक आर्थिक संकट या काळात प्रमुख कार्यात्मक क्षेत्रातील धोरणे आणि ऑपरेशन्समधील घडामोडींचा समावेश आहे. तसेच तीन गर्व्हनरांच्या कार्यकाळाचा समावेश आहे – डॉ. सी. रंगराजन यांच्या कार्यकाळाचा शेवटचा भाग, डॉ. बिमल जालान यांचा पूर्ण कार्यकाळ आणि डॉ. वाय.व्ही. रेड्डी यांच्या कार्यकाळाचा मोठा भाग यामध्ये आहे.
https://twitter.com/DrJadhav/status/1489227379306549249?s=20&t=SQhi0tOiQHxkpJq8rlN0JA
Reserve Bank Of India History Book Published
Economist Dr Narendra Jadhav