नवी दिल्ली – इंधन दरवाढीच्या भडक्यामुळे जगण्यासाठीच्या आवश्यक सर्वच वस्तू महागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झालेली आहे. महागाई कमी करण्यासाठी सरकारने दिलासा द्यावा अशी अपेक्षा जनता करत आहे. परंतु तसे प्रयत्न होताना दिसत नाहीये. याच पार्श्वभूमीवर महागाई नियंत्रणात आणण्यासाठी इंधनावरील कर घटवावा. त्याने महागाईचा दर वाढणार नाही, असे आवाहन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केंद्र सरकारला केले आहे. इंधन दरवाढ आणि अन्नधान्यांच्या किमती वाढल्याने जूनमध्ये किरकोळ महागाई दर ७ महिन्यांच्या उच्चस्तरावर राहिला आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर भारतीय अर्थव्यवस्थेला योग्य दिशेकडे नेण्यासाठी सरकारी पातळीवर मोठी पावली उचलली जाणे आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेला रूळावर आणण्यासाठी चलनविषयक उपाय राबविणे आवश्यक आहे. तसेच महागाईची स्थिती मर्यादित कक्षेत राहावी यासाठी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे शक्तिकांत दास म्हणाले.
प्रत्येक स्तरावर उपाययोजना आवश्यक
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राजकोषीय, चलनविषयक आणि प्रत्येक क्षेत्रिय पातळीवर उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे दास काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. आरबीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या तिमाही पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. पुढील काळातील परिस्थिती पाहून व्याजदर कमी ठेवण्याचे प्रयत्न सुरू राहतील, असे समितीने म्हटले आहे.
पेट्रोल शंभरीपार
पेट्रोल आणि डिझेलची किंमत गुरुवारी सलग दुसर्या दिवशी वाढली होती. त्यामुळे देशभरात इंधनाच्या किमती उच्चस्तरावर पोहोचल्या आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोल १००.२१ रुपये प्रतिलिटरवरून वाढून १००.५६ रुपयांवर पोहोचले. डिझेलचा दर ८९.६२ रुपये प्रतिलिटर नोंदविण्यात आला. देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या असून, राज्यांच्या स्थानिक करांच्या आधारावर वास्तविक दर भिन्न आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून देशात इंधनदरवाढीचा आलेख चढाच आहे.