नाशिक – कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेले रेमेडिसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने नाशिककरांचा संताप अनावर झाला आहे. त्यामुळेच उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी औषध बाजारपेठ असलेल्या गोळे कॉलनीच्या प्रवेशद्वारावर नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. “केवळ कागदोपत्री आदेश काढू नका प्रत्यक्ष रेमेडिसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करुन द्या”, “पालकमंत्री भुजबळ यांनी स्वतः या प्रश्नाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी”, अशी आग्रही मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिकेसह सरकारी रुग्णालयांच्या कारभाराबाबतही नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. इंजेक्शनसाठी वणवण भटकावे लागत असूनही ते उपलब्ध होत नाही. नेमकी समस्या काय आहे, ते गरजू रुग्णांना का मिळत नाही, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. महापालिका, आरोग्य विभाग, राज्य सरकार आदिंच्या विरोधात नागरिक जोरदार घोषणाबाजी करीत आहेत. दरम्यान, घटनेची दखल घेत पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत.