लखनऊ (उत्तर प्रदेश) – देशभरात गाजत असलेल्या अनधिकृत धर्मांतर प्रकरणात आर्थिक व्यवहाराचे पुरावे पोलिसांच्या हाती लागत आहेत. धर्मांतरासाठी पैसे गोळा करण्यासाठी अनेक प्रकारच्या ई वॉलेट आणि ऑनलाइन खात्यांचा सर्रास वापर होत आहे. एटीएसला काही खात्यांची माहिती मिळाली आहे. त्या खात्यातून रक्कम एक संस्था आणि अनेक लोकांना पाठविण्यात आली आहे. अशा एक डझन खात्यांचा तपास करून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेतली जात आहे.
दिल्लीमधील इस्लामिक दावा सेंटरचे अध्यक्ष आणि धर्मांतर करण्याचा आरोप असलेला संशयित उमर गौतम याला संस्था चालविण्यासाठी भारतातूनच नव्हे, तर परदेशातूनही निधी मिळत होता. जे लोक त्याला फंडिग करत होते, ते त्याला त्यांच्या देशात व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करत होते. हे लोक संपूर्ण देशात धर्मांतराला प्रोत्साहन देण्याचे काम करत होते. लोकांचे ब्रेन वॉश करण्यासाठी उमरला पाचारण करण्यात येत होते. तो इस्लाम धर्मामधील आस्था आणि धर्माबद्दल माहिती देत होता. त्यामुळे अनेक लोक त्याच्याकडे आकर्षित होत होते.
धर्मांतराच्या नावाखाली बहुतांश रक्कम अनोळखी खात्यात जमा होत होती. ही खाती व्यावसायिक, दुकानदार आणि इतर लोकांची असत. परदेशांमधून पैसे मागविण्यासाठी पे-पल खात्यांचा वापर होत होता. हे खाते अनेक नंबरद्वारे ऑपरेट होत होते. रक्कम येताच खाती बंद केली जात होती. त्यातील काही खाती अद्यापही सुरू आहेत.
पे-पल खाते म्हणजे काय
पे-पल एक वेबसाईट आहे. ऑनलाइन पैसे पाठविण्यासाठी या वेबसाईटचा वापर केला जातो. या वेबसाईटच्या माध्यमातून जगात कुठेही आपण पैसे पाठवू शकतो. पे-पल वेबसाईट प्रसिद्ध ऑनलाइन पेमेंट कंपनी आहे. जगातील जवळपास १ कोटी लोकांकडे पे पलचे खाते आहे.
एटीएसच्या सहकार्यासाठी पथक
सरकारच्या निर्देशानुसार एटीएसच्या मदतीसाठी जिल्ह्यातील एका एसीपीच्या नेतृत्वाखाली दोन सदस्यीय पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक धर्मांतर झालेल्या लोकांशी बोलून आरोपींवर कारवाई करणार आहे. धर्मांतरातील पीडित लोकांशी त्यांची बोलणी सुरू झाली आहे. नव्या-जुन्या सर्व प्रकरणांचा तपास केला जात आहे. एटीएसकडून मिळणारी टास्क पूर्ण करण्यासह प्रलोभन देऊन धर्मांतर करण्याची घटना समोर आल्यावर गुन्हा दाखलचे काम केले जाईल.