मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती उद्योगपती मुकेश अंबानी यांचे वार्षिक पॅकेज १५ कोटी रुपये आहे. तुम्ही म्हणाल, श्रीमंत व्यक्तीला १५ कोटीचे पॅकेज मग यात विशेष काय आहे. विशेष हेच आहे की, ३१ मार्चपर्यंतचे आर्थिक वर्षाअखेरपर्यंत मुकेश अंबानी यांनी कंपनीकडून एक रुपयाही पगारापोटी घेतलेला नाहीये. कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे उद्योग आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्यामुळे त्यांनी स्वेच्छेने पगार घेतले नसल्याचे रिलायन्स इन्डस्ट्रीजकडून सांगण्यात आले आहे.
रिलायन्सच्या वार्षिक अहवालानुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षात अंबानी यांनी श्रमाचे मूल्य शून्य होते. त्या मागील आर्थिक वर्षात त्यांना कंपनीकडून १५ कोटी रुपयांचे वेतन मिळत होते. गेल्या १५ वर्षांपासून त्यांना इतकेच उत्पन्न कायम आहे. अंबानी यांचे चुलत बंधू निखिल आणि हिताल मेसवानी यांना २४ कोटी रुपये पगार कायम राहिला. यावर्षी त्यांच्या पगारात १७.२८ कोटी रुपयांचे कमिशनचा समावेश आहे.
इतर लोकांचा पगार
कार्यकारी संचालक पी. एम. एस. प्रसाद आणि पवन कुमार कपिल यांच्या पगारात वाढ झाली आहे. प्रसाद यांना २०२०-२१ मध्ये ११.९९ कोटी रुपये मिळाले. गेल्या वर्षी हाच आकडा ११.१५ कोटी रुपये इतका होता. त्याचप्रमाणे कपिल यांचा पगार ४.०४ कोटी रुपयांवरून वाढून ४.२४ कोटी रुपये झाला आहे.
नीता अंबानी यांना ८ लाख
अंबानी यांची पत्नी नीता अंबानी कंपनीच्या संचालक मंडळात गैरकार्यकारी संचालक आहेत. त्यांना प्रत्येक बैठकीत ८ लाख रुपये आणि १.६५ कोटी रुपयांचे कमिशन मिळाले आहे. यादरम्यान सर्व स्वतंत्र संचालकांना १.६५ कोटी रुपयांचे कमिशन आणि ३६ लाख रुपयांचे बैठक शुल्क मिळाले आहे.
कर्मचाऱ्यांची विशेष काळजी
कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या कंपनीच्या कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत मृत कर्मचार्यांच्या कुटुंबाला येत्या पाच वर्षांपर्यंत पगार दिला जाणार आहे. कर्मचार्यांना शेवटचा पगार जितका मिळाला होता, तितकाच पगार पुढे दिला जाणार आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या पाल्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी सहाय्य करण्यात येणार आहे.