मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत मुंबईत राज्य सरकारचे विविध निर्णय जाहीर करताना दुसरीकडे त्यांना शिवसेनेतील अनेक पदाधिकारी येऊन मिळत आहेत, त्याच वेळी त्यांचे दिल्ली दौरे देखील सुरू आहेत तर विरुद्ध बाजुला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तसंच शिवसेना खासदार संजय राऊत हे शिंदे एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांवर जोरदार हल्ला चढवत आहेत.
आदित्य ठाकरे हे आपले पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली. या यात्रेत औरंगाबादेतून बोलताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांनी राजीनामा देऊन निवडणुकांना पुन्हा सामोरे जावे, असे आव्हान यांनी वारंवार केले आहे. त्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्या आव्हानाला उत्तर दिले आहे.
मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढायला तयार आहे, फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी परवानगी द्यावी. मग कळेल कोण गद्दार आणि काय निष्ठा, अशा शब्दात सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच माझी मातोश्रीवर जायची इच्छा नाही. आदित्य ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी माझ्या मतदारसंघात यावं. या आधी आला नव्हतात, पण आता या, असा टोलाही सत्तार यांनी लगावला.
तसेच सर्व जनता शिंदे यांची वाट पाहत आहे. आमच्या मराठवाड्यात शिंदे यांचा एकही आमदार पडणार नाही, याची शाश्वती मी देतो. मी ४२ वर्षांपासून राजकारणात, २५ वर्षांपासून आमदार, ३ वेळा मंत्री झालो. ते एकदाच मुख्यमंत्री झाले आहेत. आदित्य ठाकरे माझ्या मतदारसंघात कधी आलेच नाही. म्हणूनच माझ्यासारख्या गद्दाराच्या मतदारसंघात या, असे मी त्यांना निमंत्रण देतो. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे अनुयायी आहेत. उद्धव ठाकरेंना शिंदे यांच्या निष्ठेवर शंका आहे. आम्ही आता युतीचा धर्म पाळत आहोत.
शिवसेना पक्ष – संघटना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी नुकताच नाशिक, औरंगाबाद आणि नगरचा दौरा केला. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. या पार्श्वभूमीवर दुसरीकडे आता एकनाथ शिंदेही नाशिक आणि औरंगाबादचा दौरा करणार आहेत. दि. 30 आणि 31 जुलैला शिंदे या दोन शहरांच्या दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रेवर आहेत. यादरम्यान त्यांनी त्यामुळे बंडखोर आमदारांच्याच मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. काल वैजापूर, औरंगाबाद पश्चिम मतदार संघात आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांचा मेळावा घेतला तर पैठण, गंगापूरमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. माजी मंत्री संदिपान भूमरे यांच्या पैठण मतदार संघात हा मेळावा झाला.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की,सगळे काही ठीक सुरु असताना गद्दारी करण्याची गरज काय पडली? नेमके असे काय घडले? हे बेकायदेशीर सरकार कोसळणार आहे. पण हे सगळे होत असताना विधानसभेत माझ्यासोबत 15 आमदार होते. आम्ही सगळे सोबत बसलेलो. तेव्हा तात्पुरते समोर ते बसले होते. जेव्हा ते समोर बसलेले आम्ही स्वाभिमानाने त्यांच्याकडे पाहत होतो आणि समोर बसलेले गद्दार आमच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हते. त्यांचे खरे मुखवटे आता फाटले आहेत.









