मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या विरोधात बंड करून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी आता एक मोठा निर्णय घेतला आहे. बंडखोरीच्या या निर्णयाने शिवसैनिक खूश आहेत की नाराज याचीच चिंता त्यांना सतावत आहे. शिवसैनिकांच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी आता शिंदे यांनी जालीम उपाय शोधला आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या राज्यभरात दौरा करीत आहेत. शिवसैनिकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी रॅली काढत आहेत आणि विशेषतः बंडखोर आमदारांच्या भागात जात आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे शिवसेनेत सर्वेक्षण करण्याचा विचार करत आहेत. याद्वारे त्यांच्या बंडाच्या निर्णयावर शिवसैनिकांचे काय मत आहे, हे जाणून घ्यायचे आहे. वास्तविक, एकनाथ शिंदे यांना मुंबई महापालिका निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे नियोजन करायचे आहे. सर्वेक्षणातील शिवसैनिकांचा मूड जाणून घेतल्यानंतर नियोजन सोपे होईल, असा विश्वास त्यांना आहे.
एकनाथ शिंदे गटाला या सर्वेक्षणासाठी एका संस्थेची नियुक्ती करायची आहे. त्यामुळे बंडखोरीबद्दल जनतेचे काय मत आहे, हे समजून घेणेही सोपे जाईल, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला आहे. शिंदे गटाला सध्या अनेक चिंता सतावत आहेत. आपल्याविरुद्ध जनता कौल घेईल काय, ही प्रमुख चिंता आहे. शिवसेनेचे ५४ पैकी ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्याबाजूने आहेत. तरीही कार्यकर्ते त्यांना साथ देतील की नाही याबाबत शंका आहे. अशा स्थितीत या सर्वेक्षणातून ते जनतेची मनस्थिती समजून घेणार आहेत.
या सर्वेक्षणासाठी शिंदे गटाने कर्नाटकातील सार्वजनिक धोरण संशोधन संस्था आणि दिल्लीस्थित निवडणूक संशोधन संस्थेशी संबंधित व्यक्तींची भेट घेतली आहे. आतापर्यंत एकनाथ शिंदे गटाकडून या सर्वेक्षणाबाबत कोणतेही वक्तव्य करण्यात आले नसले तरी आगामी निवडणुकीसाठी हे सर्वेक्षण केले जात असल्याचे मानले जात आहे. सर्वेक्षणाची ही कल्पना एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची असल्याचे सांगितले जाते. त्यांनी दिल्लीतील सर्वेक्षण संस्थेच्या लोकांची भेट घेतली आहे.
शिंदे-फडणवीस सरकार लवकरच जाईल या विचाराने उद्धव ठाकरे गट सध्या खुपच सक्रिय आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवा सेना प्रमुख आदित्य यांची रॅली आणि दौरे सध्या बंडखोरांना काळजीत टाकत आहेत. कारण, बंडखोरांच्या भागातील आदित्य यांच्या दौऱ्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिवसंकल्प यात्रेअंतर्गत ते राज्यभर जात आहेत. विशेषत: पक्षाविरोधात बंडखोरी केलेल्या आमदारांच्या भागात दौरे करीत आहेत. जे खरे शिवसैनिक आहेत त्यांनी आपल्यासोबत यावे, असे आवाहन ते करत आहेत. अशा परिस्थितीत आगामी काळात शिवसैनिकांचा काय दृष्टीकोन असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यासाठीच हे सर्वेक्षण महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे.
Rebel Leader Eknath Shinde Big Decision for Shivsainik
Politics Shivsena Survey MP Shrikant Shinde