नाशिक – केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किंमती भरमसाठ वाढविल्या असून सर्वसामान्यांना मेटाकुटीला आणले आहे. कोरोना काळात रुग्णवाहिकेमध्ये इंधन टाकण्याची सोय होत नसल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ कोरोना नियमांचे पालन करत युवक शहाराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली ठराविक पदाधिकाऱ्यांसोबत रुग्णवाहिकेला धक्का मारत आंदोलन केले. तसेच शहरातील विविध पेट्रोल पंपावर विभाग अध्यक्ष व शहर पदाधिकाऱ्यांनी ग्राहकांना पुष्प देऊन उपहासात्मक आंदोलन केले.
भारतात इंधनाच्या किमती झपाट्याने वाढत असून पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. कोरोना मुळे संचार बंदी असताना सर्वसामान्य जनतेचे आर्थिक हाल होत आहे. अशात केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेच्या विचार न करता सततची इंधनदर वाढ करून तुघलकी निर्णय घेत आहे. यात सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले आहे. इंधनदर वाढीमुळे साहजिक महागाईत वाढ होणार आहे. कोरोना काळात रुग्णाना बेड उपलब्ध होत नसून रुग्णवाहिकेत इंधन टाकणे सुद्धा परवडणारे नाही. यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी रुग्णवाहिकेला धक्का देत उपहासात्मक आंदोलन केले. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी झाल्या पाहिजे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी संदीप खैरे,संदीप गांगुर्डे,संतोष जगताप,अक्षय पालदे, रोहित जाधव, राज रंधवा,जॉनी सोळंकी,राम शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.