राष्ट्रवादी युवक राबवणार ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ मोहीम
नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज २२ वा वर्धापन दिन असून या निमित्ताने मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ ही मोहीम राष्ट्रवादी युवकने हाती घेतली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ११००० पत्रं पाठवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ राष्ट्रवादी भवन येथे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी युवकने नवी मोहीम हाती घेतली असून मराठा समाजातील मुलांच्या भविष्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देऊन त्यांचे भविष्य उज्वल करावे. मराठा आरक्षणातील कायदेशीर पेच केंद्र सरकारच सोडवू शकणार असून मराठा आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादेची अट शिथिल करण्यासाठी संविधानात दुरुस्ती करायला हवी. त्यासाठी दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा. तसेच केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.










