इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– रामायण यात्रा भाग १ –
– अयोध्या –
अयोध्या हे केवळ एक नगर नाही तर प्रत्येक भारतीय मनावर जन्मोजन्मी रुजलेला एक संस्कार आहे. भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील या महत्वाच्या पौराणिक, धार्मिक आणि ऐतिहासिक नगराला अयोध्ये प्रमाणेच ‘साकेत’ आणि ‘रामनगरी’ही देखील नावे आहेत. सरयू नदीच्या काठावर वसलेलं अयोध्या हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे.
पौराणिक काळापासून अयोध्येवर सूर्यवंशी, रघुवंशी ,अर्कवंशी राज घराण्यांनी अनेक शतके राज्य केले. याच वंशांत भगवान विष्णुनी श्रीरामाचा अवतार घेतला अशी हिंदू मनावर पारंपरिक मान्यता आहे.
साक्षांत मनुने या नगराची रचना केली असे म्हणतात आणि त्यानेच या नगरीचे नाव ‘अयोध्या’ म्हणजे युद्ध करुन जिंकता न येणारी नगरी असे ठेवले.
हजारो वर्षांपासून अयोध्या ही एक पवित्र नगरी आहे आणि तिथे भगवान श्रीराम यांचा जन्म झाला होता हे प्रत्येक भारतीयाला पिढ्यांपिढ्या पासून ठावूक आहे. वाल्मीकि रामायणापासून तर रामचरितमानस सारख्या हजारो साधू -संत, ऋषि- महंत या विद्वांनांनी लिहिलेल्या धार्मिक पौराणिक ग्रंथात आपण हे वाचत, ऐकत आलो आहोत.
अयोध्या म्हणजे श्रीराम आणि श्रीराम म्हणजेच अयोध्या हे वचन हिंदू मनावर इतके खोल रुजलेले आहे की स्वप्नातही या दोन गोष्टी आपण वेगळ्या मानू शकत नाही. जगभरातल्या हजारो भाषेतील कवी,लेखक ,विद्वान अभ्यासकांनी अयोध्ये विषयी लिहिले आहे. अयोध्ये विषयी जुना लिखित पुरावा सातव्या शतकात भारतात आलेल्या ‘ह्वेन त्सांग’ या चीनी प्रवाशाच्या साहित्यात मिळतो.त्यावेळी त्याने भारतात येउन दोन वेळा अयोध्येला भेट दिली होती. त्यावेळी येथे २० बौद्ध मंदिरं आणि ३००० भिक्षु होते आणि तरीही अयोध्येत प्रमुख मंदिर हे श्रीराममंदिरच होते. भाविकांची सर्वाधिक गर्दी श्रीराम मंदिरातच होती हे स्पष्टपणे लिहून ठेवले आहे.
पौराणिक ग्रंथानुसार मोक्षदायिनी सात नगरीमध्ये प्रथम क्रमांक अयोध्येचा लागतो. यासंदर्भातला प्रसिद्ध श्लोक असा-
अयोध्या,मथुरा,माया, काशी,कांची,अवंतिका |
पुरी द्वारावती चैव सप्तता मोक्षदायिका ||
म्हणजे ‘अयोध्या’, ‘मथुरा’, ‘हरिद्वार’ , ‘काशी’, ‘कांचीपुरम’,’उज्जैन’ आणि ‘द्वारिका’ या सात नगरी मोक्ष देणार्या आहेत. येथे जन्म घेणार्या, राहणार्या प्राण्यांची जन्म-मृत्युच्या फेर्यातुन सुटका होते त्यांना थेट स्वर्गात प्रवेश मिळतो.
हजारो वर्षांपासून अयोध्या हे मंदिरांचे नगर आहे.आजही हिंदू, जैन, बौद्ध धर्माशी निगडित असलेली हजारो मंदिरं या ठिकाणी आहेत. जैन धर्मानुसार जैनांच्या 24 तीर्थंकारांपैकी पहिले तीर्थंकार ऋषभनाथ, दुसरे अजितनाथ, चौथे अभिनंदननाथ पाचवे सुमतिनाथ आणि चौदावे अनंतनाथ या ५ तिर्थंकारांचा जन्म अयोध्येत झाला आहे. त्याचप्रमाणे जैन आणि वैदिक धर्मानुसार भगवान रामचंद्र यांचा जन्म देखील याच भूमीत झालेला आहे.
मानवी सभ्यतेची पहिली सुसंस्कृत नगरी होण्याचा मान अयोध्येला दिला जातो.
अयोध्येत पाहण्यासारखी अनेक ठिकाण आहेत. यात, ‘श्रीराम जन्मभूमी’,’कनक भवन’, ‘हनुमान गढ़ी’, ‘राज द्वार मंदिरं’, ‘दशरथ महल’, ‘लक्ष्मण किला’, ‘कालेराम मंदिर’, ‘मणिपर्वत’, ‘श्रीरामकी पैडी’,’नागेश्वरनाथ मंदिर’, ‘क्षीरेश्वर मंदिर’, ‘श्रीअनादी पंचमुखी महादेव मंदिर’, ‘गुप्तार घाट’ यांचा समावेश केला जातो.
तसेच ‘बिरला मंदिर’, ‘श्रीमणिरामदासजी की छावनी’, ‘श्रीरामवल्लभा कुंज’, ‘श्री लक्ष्मण किला’, ‘श्री सियाराम किला’, ‘उदासीन आश्रम’ तसेच ‘हनुमान बाग़’ यांसारखे अनेक आश्रम येथे येणार्या भाविक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाची धार्मिक ठिकाणे आहेत.
मुख्य उत्सव
अयोध्योत वर्षभर कोणते ना कोणते उत्सव सुरु असतात.परंतु सर्वाधिक उत्साह असतो तो श्रीराम नवमी, श्रीजानकी नवमी, गुरुपौर्णिमा,सावन झुला,कार्तिक परिक्रमा आणि श्रीराम जानकी विवाह महोत्सवात.लाखो भाविकांच्या उपस्थितीत हे सर्व उत्सव साजरे केले जातात.
अयोध्येतील प्रमुख आकर्षण- श्रीरामजन्मभूमी!
अयोध्येतील सर्वच मंदिरं वन्दनीय आहेत परंतु देशातील आणि परदेशातील लाखो भाविक आणि पर्यटक यांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे श्रीरामजन्मभूमी!
अयोध्येच्या पश्चिमेला रामकोट नावाच्या भागात बहुचर्चित श्रीरामजन्मभूमी आहे. अयोध्येत येणारा प्रत्येक भाविक आणि पर्यटक श्रीरामजन्मभूमीला भेट देतोच.
श्रीरामा प्रमाणेच त्याचे बंधू भरत,लक्ष्मण आणि शत्रुघ्न या चारही भावंडाचे बालरूप दर्शन येथे घडते. हेच ते ठिकाण आहे जिथे साक्षांत भगवान विष्णुचा अवतार असललेल्या प्रभु रामचंद्रानी आपल्या बाललीलानी राजा दशरथ, माता कौसल्या ,सुमित्रा आणि कैकयी यांना आनंद दिला. श्रीरामाचे बालपण आनंदात गेले. येथेच बालरामाने चंद्र हातात धरण्यासाठी हट्ट केला होता. येथूनच विश्वामित्र ऋषि लहानग्या राम, लक्ष्मणाला धनुर्विद्या शिकविण्यासाठी आपल्या आश्रमात घेवून गेले होते.
भारतातून आणि परदेशातून येथे वर्षभर भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने येतात मात्र सर्वांत जास्त भाविक जमा होतात ते श्रीरामनवमीला.
२०२४ च्या मकरसंक्रांतीला श्रीरामजन्मभूमी मंदिराचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने सध्या येथे मंदिराचे बांधकाम येथे दररोज हजारोंच्या संख्येने येणार्या भाविकांच्य उपस्थितीत अतिशय वेगात व नियोजनपूर्वक सुरु आहे.
श्री कनक भवन
अयोध्येतील दुसरे महत्वाचे ठिकाण म्हणजे कनक भवन. कनक भवन म्हणजे सोन्याचे भवन. हनुमान गढ़ी पासून जवळच हे ठिकाण आहे.
अयोध्येतील कनक भवनला सीता व श्रीराम यांच्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. सीतेचा रामाशी विवाह झाल्या नंतर कैकेयीने ‘मुँह दिखाई ‘ म्हणून हा महाल सीतेला भेट दिला होता असे सांगितले जाते. त्यानंतर काही दिवस सीता आणि राम याच कनक भवनात राहिले होते.
आजच्या घडीला अयोध्येतील सर्वांत प्रेक्षणीय आणि सुस्थितीत असलेले एकमेव ठिकाण म्हणजे कनक भवन. अयोध्येत येणारा प्रत्येक भाविक आणि पर्यटक श्रीराम जन्मभूमी प्रमाणेच ‘कनक भवन’ ला अवश्य भेट देतो.
टीकमगढ संस्थानची महाराणी वृषभानू कुमारी बुंदेला हिने पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी इ.स. १८९१ मध्ये अयोध्येत कनक भवन उभारले. परंतु पुत्रप्राप्ती न झाल्याने आपल्या गुरूच्या सल्ल्यानुसार जनकपूर येथे जानकी मंदिर उभारले. विशेष म्हणजे जनकपुर येथील जानकी मंदिराचे काम सुरु झाल्यावर वर्षाच्या आतच महाराणी वृषभानू कुमारी यांना पुत्रप्राप्ती झाली.
या मंदिरातील श्रीराम व सीतामाई यांच्या मुर्तीना सोन्याचे मुकुट घातलेले असतात. श्रीराम व सीतामाई यांच्या या मुर्तींची जगातील सर्वांत सुंदर मुर्तीत गणना केली जाते.
हनुमान गढ़ी
जिथे राम आहे तिथे हनुमान नसेल असे कधी होईल का? रामाच्या या जन्मभूमीत म्हणजेच अयोध्येत प्राचीन काला पासून आज पर्यंत सर्वांत लोकप्रिय ठिकाण आहे ते म्हणजे -हनुमानगढ़ी!
अयोध्येच्या अगदी केंद्रस्थानी हनुमानगढ़ी आहे. या ठिकाणी प्रभु रामचंद्राच्या वेळेपासून आजपर्यंत सदैव हनुमानाचा वास आहे अशी श्रद्धा आहे.त्यामुळेच अयोध्येला आल्यावर भाविक सर्वप्रथम हनुमानगढ़ीवर जावून हनुमानाचे दर्शन घेतात आणि नंतरच त्यांची पावले श्रीरामजन्मभूमीकड़े वळतात.
अयोध्येतील सर्वांत प्रमुख आणि भक्तप्रिय असलेली हनुमानगढ़ी हे मंदिर राजद्वार समोर एका उंच टेकडीवर वसलेले आहे. हनुमानजीच्या या मंदिरांत जाण्यासाठी ७६ पायर्या चढून जावे लागते.
प्रभु रामचंद्रानी अवतार समाप्त करण्यापूर्वी हनुमानावर येथेच राहून अयोध्येचे रक्षण करण्याची कामगिरी सोपविली होती. तेव्हापासून इथल्या एका गुफेत राहून हनुमान श्रीरामजन्मभूमि आणि अयोध्येचे रक्षण करीत असतात अशी श्रद्धा आहे.
हनुमानगढ़ीच्या मुख्य मंदिरांतील गाभार्यात हनुमानाची ६ इंच उंचीची धातूची मूर्ती आहे. माता अंजनीच्या मांडीवर बाल रूपातील हनुमान बसलेला आहे अशी ही मूर्ती आहे.ही मूर्ती सदैव पाना फुलांनी सुशोभित केलेली असते.
अयोध्येचा एक नबाब सुलतान अली याच्या एकुलत्या एक पुत्राचे प्राण या बाल हनुमानाने वाचविले त्यामुळे त्याने हनुमान गढ़ीचा जीर्णोद्धार केला असे सांगितले जाते. एवढच नाही तर ताम्रपत्र लिहून या मंदिरावर भविष्यात कुणाही राजाचा वा शासकाचा अधिकार राहणार नाही तसेच मंदिराच्या व्यवस्थेसाठी कोणताही कर लावला जाणार नाही याची घोषणा केली. त्याचप्रमाणे हनुमानगढ़ी आणि चिंच वनासाठी ५२ बिघे जमीन कायमस्वरूपी दान दिली.याचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत.
हल्लीची हनुमान गढ़ी नेमकी कधी स्थापन झाली याचा ठोस पुरावा नाही कारण काळाच्या ओघात खुद्द अयोध्या नगरीच अनेक वेळा वसली आणि नष्ट झाली परंतु इथली हनुमानगढ़ी मात्र कायम सुरक्षित राहिली. शाहिर दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे तर-
आले किती, गेले किती, संपले भरारा
तुझ्या परी नामाचा रेss अजूनी दरारा ||
लंकेहून रावणाचा वध करुन परत येतांना विजयाचे प्रतिक म्हणून आणलेले निशाण आजही येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहे.काही विशेष प्रसंगी हे निशाण बाहेर काढले जाते व त्याची पूजा अर्चा केली जाते.
हनुमानगढ़ी वरील हनुमानाला आजही अयोध्येचा राजा मानलं जातं.या मंदिरांत येणार्या प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात.
राजद्वार मंदिर
अयोध्येतील आणखी एक महत्वाचे ठिकाण म्हणजे राजद्वार मंदिर! हनुमानगढ़ी पासून अगदी जवळच हे मंदिर आहे.
आचार्यपीठ श्री लक्ष्मण किला
मध्य प्रदेशातील सुप्रसिद्ध संत श्री युगुलानन्यशरणजी महाराज यांच्या तपोभूमीला आचार्य पीठ असे म्हणतात. स्वामी युगुलानन्य शरणजी महाराज यांनी ‘रघुवर गुण दर्पण’, ‘पारस भाग’, ‘श्रीसीतारामनाम प्रताप प्रकाश’ तसेच ‘इश्क-कांति’ सारखे १०० ग्रन्थ श्रीरामाचेसंदर्भात लिहिले आहेत.
मध्यप्रदेशातील रिवा संस्थानाने त्यांची अगाध रामभक्ति पाहून त्यांना अयोध्येत ५२ बिघे जमिनीवर श्री लक्ष्मण किला बांधून दिला. सरयू नदीच्या काठावरच हा किला असल्याने येथून दिसणारा सूर्यास्त पाहण्यासाठी भाविक दररोज मोठ्या संख्येने जमतात.तसेच येथे यात्रेकरू आणि पर्यटक यांच्या निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था उपलब्ध असते.
नागेश्वरनाथ मंदिर
अयोध्येत सरयू नदीच्या काठावर विक्रमादित्याच्याही पूर्वी पासून अस्तित्वात असलेले नागेश्वरनाथ नावाचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. श्रीरामाचे सुपुत्र कुश याने हे मंदिर बांधले असे म्हणतात.
कुश एकदा सरयू नदीत स्नान करीत असता त्याचा एक बाजूबंद पाण्यात पडला.हा बाजूबंद एका नागकन्येला मिळाला. तिचे कुशावर प्रेम जडले. ती नागकन्या शिवभक्त होती म्हणून कुश याने तिच्यासाठी श्रीनागेश्वरनाथ मंदिर बांधले अशी आख्यायिका सांगितली जाते.
श्रीअनादी पंचमुखी महादेव मंदिर
अयोध्येतील गोप्रतार घाटावर पंचमुखी शिवमंदिर आहे.हे मंदिर अनादि काळापासून अस्तित्वात आहे असे सांगितले जाते. शैवागम मध्ये वर्णिलेले ईशान, तत्पुरुष, वामदेव,सद्योजात आणि अघोर या पांच मुखाच्या शिवलिंगाची येथे पूजा केली जाते त्यामुळे भोग आणि मोक्ष या दोन्हीची प्राप्ती होते असे मानले जाते.
राघवजीचे मंदिर
अयोध्येच्या मध्यभागी भगवान श्रीरामजी यांचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरांत फक्त प्रभु श्रीराम यांचीच मूर्ती आहे. सरयू नदीत स्नान केल्यानंतर येथील राघवजीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.
सप्तहरी मंदिर
अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाशिवाय श्री हरिने आणखी सात अवतार घेतले असे म्हणतात. वेगवेगळया काळांत ऋषि,मुनि आणि देवता यांच्या तपस्येमुळे देवाने ही रूपं घेतली. भगवान विष्णुच्या या सात रुपांना ‘सप्तहरी’ या नावाने ओळखतात. या सात रुपाना ‘गुप्तहरी ‘, ‘विष्णुहरी ‘,’ चक्रहरी’, ‘पुण्यहरी’, ‘चंद्रहरी’, ‘धर्महरी’,आणि ‘बिल्वहरी’ असे म्हणतात.
जैन मंदिरं
हिंदूंच्या रामजन्मभूमी मंदिरा प्रमाणे जैन धर्मियांची असंख्य मंदिरं अयोध्येत आहेत. जैन धर्मातील 24 तीर्थंकरांपैकी ५ तिर्थंकारांची जन्मभूमी अयोध्या असल्याने येथे अनेक जैन मंदिरं देखील आहेत. त्यामुले देशभरातील असंख्य जैन भाविक देखील अयोध्येला वर्षभर भेट देतात.
स्मरणीय संत
प्रभु श्रीरामचंद्राच्या या जन्मभूमीत अनेक उच्च कोटीचे संत महंत होवून गेले त्यांचे अत्यंत प्रतिष्ठित आश्रम येथे आहेत.
सरयुची महाआरती
वाराणशीतील गंगेच्या सायं आरतीच्या धर्तीवर अयोध्येत देखील रोज सायंकाली सरयू नदीची आरती केली जाते. त्यासाठी रोज सायंकाली सुर्यस्तानंतर सरयू घाटावर सायं आरतीचे आयोजन करण्यात येते. हजारो भाविक हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी सरयू घाटावर जमतात.
कसे जावे?
भारतातले सर्वांत प्रमुख धार्मिक ठिकाण असलेले अयोध्या रेल्वे आणि बस मार्गाने संपूर्ण देशाशी जोडलेले आहे.
राष्ट्रीय राजमार्ग २७ आणि राष्ट्रीय राजमार्ग ३३० तसेच राज्य राजमार्गाने अयोध्या सर्व प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. लखनौ-बनारस लोहमार्गावर फैजाबादनंतर अयोध्या रेल्वे स्टेशन आहे.
अशिया खंडातले सर्वांत बेस्ट रेल्वे स्टेशन म्हणून अयोध्या रेल्वे स्टेशन विकसित करण्यात येत आहे.
येथे यात्रेकरू आणि पर्यटक यांच्या भोजन व निवासासाठी प्राचीन काळापासून अनेक धर्मशाळा तसेच अद्ययावत होटेल्स उपलब्ध आहेत.
-विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Ramayana Yatra Part1 Ram Birth Place Ayodhya by Vijay Golesar