नाशिक – मुंबई नाका येथील रामा हेरीटेज या हॉटेलच्या स्टोअर रूमला लागलेल्या आगीत हॉटेलच्या हेड शेफचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास अचानक ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अर्धा तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. पण, आग विझवल्यानतंर तब्बल अर्धा तासांनी शेफचा मृतावस्थेत मृतदेह सापडला. त्यामुळे मृतकाच्या नातेवाईकांनी घातापाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पण, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवून नातेवाईकांना घटनेची सत्यता सांगितली. त्यात कोठेही घातपात नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
या आगीत रूपेश रामदास गायकवाड (४७, रा. राणेनगर, इंदिरानगर) असे मृत्यूमुखी पडलेल्या हॉटेल कर्मचाऱ्याचे नाव आहे. गायकवाड यांच्याकडे हॉटेलच्या किचनची जबाबदारी होती. शुक्रवारी किचन शेजारी असलेल्या स्टोअर रूममध्ये अचानक आग लागल्याने त्यांना स्टोअर रूममधून बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्याचा या आगीत मृत्यू झाला. गायकवाड यांच्या पश्चात १९ वर्षांचा मुलगा, १५ वर्षांची मुलगी, पत्नी असा परिवार आहे.
या घटनेत अर्धा तासांमध्ये आग विझल्यानंतर अगिनशमन दलाचे जवान गेले. त्यानंतर त्यांना पुन्हा बोलावण्यात आले. यावेळी जळालेल्या सामानामधून एक हात बाहेर आला असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर अगिन्शमन दलाने या घटनेची माहिती त्वरीत पोलिसांना दिली. त्यानंतर झालेला प्रकार समोर आला. या घटनेत नेहमीप्रमाणे कामावर गेलेल्या गायकवाड यांचा या घटनेत मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे शनिवारी सकाळी नातेवाईक मोठ्या संख्येने हॉटेलबाहेर जमा झालेत. हा घातापाताचा प्रकार असून, मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला. त्यामुळे काही काळ तणावही निर्माण झाला. पण, सत्यता समोर आल्यानंतर तणाव निवळला.