बहुआयामी जिजामाता
स्त्री जन्माला येणे म्हणजेच multitasking चा गुण असणे हे निश्चित असते. त्यातही तो नियोजनपूर्वक वापरला की सामान्यच अतिसामान्य व्यक्तीमत्व बनून जगासमोर येते अशाच व्यक्तीमत्वाच्या होत्या राष्ट्रमाता जिजाऊँ, ज्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील जाधवराव देशमुख यांच्या घरी झाला.
वयात आल्यावर त्यांचे लग्न शहाजी भोसले यांच्याशी झाले. शहाजी राजे भोसले हे निजामशाहीत सरदार होते. तत्कालीन परिस्थिरतीमध्ये एकत्र कुटुंबपद्धती असून सुद्धा काही कारणास्तव एकत्र राहता येत नसल्यामुळे शहाजी राजांच्या पुण्यातील जहागिरीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी जिजाबाई यांच्यावर आली. तेव्हापर्यंत जिजाबाई यांना एकूण सहा मुले झाली होती. त्यातील 4 अल्पायुषी ठरली, तर संभाजी आणि शिवाजी ही दोन मुले जीवंत राहिली.
शिवाजी महाराज यांना संस्कारित करण्याचे मोलाचे कार्य जिजामाँ करीत असताना त्यांच्यात लढाऊवृत्ती, न्यायवृत्ती, प्रजेवरील निस्सीम प्रेम करण्याचे धडे दिले. सोबतच बाल शिवाजीच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करण्याचे कार्य जिजाऊँ यांनी जाणीवपूर्वक केले. आईमध्ये असणारी उदारवृत्ती आपल्या सर्वच लेकरांना समान लेखण्याचा स्वाभाविक स्वभाव आपसुकच शिवाजी महाराज यांच्यात रूजत गेला.
जेव्हा-जेव्हा स्त्री तिच्या प्राथमिकतेनुसार आपली भूमिका निभावत असते, तेव्हा-तेव्हा त्या –त्या क्षेत्राशी निगडीत प्रचंड सकारात्मक बदल दिसून येतो. ती आईची असो, घरकाम करणाऱ्या बाईची असो किंवा आजच्या कामकरी महिलांची असो. बाळ शिवाजीच्या मनात स्वराज्याचे स्वप्न आणि आपल्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवण्याचा भरोसा निर्माण केला. तत्कालीन परिस्थिती कठीण असताना सुद्धा भविष्याचा वेध घेत द्यानर्जन सोबत निरीक्षणवृत्ती आणि उमदेपणा निर्माण करण्यात जिजाऊँने शिवरायांच्या मनात आशावाद निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या.
असे ही म्हणता येईल जिजाऊँनी दिलेला कानमंत्र शिवरायांच्या मनात, मेंदूत आणि मनगटात एवढा जबरदस्त पाझरला की त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे अख्ख्या महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे आदर्श राजे झाले. परदेशी इतिहासकारांनी लिहिलेला शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना रोमहर्षता आणि आर्श्चयकारक असाच आहे. शिवाजी महाराजांच्या मागे भक्कमपणे उभ्या होत्या त्या जिजाऊँ जणू जिजाऊँमध्ये माता भवानी देवीने आपली दैवीशक्ती प्रदान केली असावी.
जिजाऊँ या उत्तम व्यवस्थापक असल्याचे ऐतिहासिक दाखले आहेत. त्यांनी विश्वासू सरदारांना हाताशी घेऊन पुणे जहांगिरीचे व्यवस्थापन उत्तमरीत्या हाताळले होते. पुण्यात लालमहाल प्रासाद बांधला. जिजाबाईंनी त्यांच्या जहागिरीतील मदिरांमध्ये डागडूजी केली, तेथे दिवाबत्तीची सोय केली. खेड-शिनापुर येथे वाडा बांधला. शहाबाग नावाची बाग तयार केली. वडील आणि पती जहागिरदार असल्याने आपसूकच राजकारणाची जाण होत गेली.
पुणे प्रांताच्या राज्यकारभारातील बारीक-सारीक विषयांवर त्या लक्ष देत, अनेक प्रसंगी न्यायनिवाडा करीत. स्त्री राज्यकर्ती म्हणून त्यांची जबाबदारी निरपेक्ष असल्याचे दिसते. शिवाजी महाराज मोहिमेवर असताना जिजाबाईच राज्यकारभार चालवायच्या. महाराज आग्राभेटीवर गेले असताना त्यांनी सर्व कारभार शिक्का जिजाऊच्याकडे सुपुर्द केला होता. ज्याप्रमाणे जिजाऊ स्वाभिमानी, धाडसी, करारी, दृढनिश्चयी आणि स्वतंत्र वृत्तीच्या होत्या, त्याचप्रमाणे मायेच्या वात्सल्याने भरलेला काठोकाठ माठ ही होत्या. त्यामुळेच शिवाजी महाराज्याप्रमाणे, संभाजीराजे, तत्कालीन मावळे आणि रयतेवर त्यांचा प्रेमाचा आपुलकीचा, उदारपणाचा वर्षाव होत राहिला. त्या काळाला खऱ्या अर्थाने सुवर्ण काळ बनविणाऱ्या होत्या. “जिजामाँ” स्त्री म्हणून, आई म्हणून, राज्यकर्ती म्हणून आणि स्वतंत्र व्यक्ति म्हणून जीजाबाई बहुआयामी अशाच होत्या.
- अंजु निमसरकर, माहिती अधिकारी, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली