इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे रुग्ण वाढत असून, रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. रुग्णसंख्या वाढत असली तरी सर्वांनाच रुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज भासत नाहीये. रुग्णांवर घरी उपचार करणे शक्य आहे. कोविडसाठी मोलनुपिराविर हे अँटिव्हायरल औषध जादूचे औषध नाही, असे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) च्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
एम्सच्या वैद्यकीय विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. नीरज निश्चल सांगतात, आतापर्यंत कोविडवरील उपचारासाठी सध्या कोणतेही औषध उपलब्ध नाही. रुग्णांवर करडी नजर ठेवणे आवश्यक आहे. विशेषतः इतर आजारांनी ग्रासलेले ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांनी अद्याप लसीकरण करून घेतले नाही अशा रुग्णांना देखरेखीखाली ठेवणे आवश्यक आहे.
डॉ. निश्चल पीटीआयशी बोलताना सांगतात, तुमचे डॉक्टर जोपर्यंत अनेक प्रकारची औषधे किंवा नव्या गोळ्या देत नाही, तोपर्यंत तुम्ही कोविडमधून बरे होणार नाही, असे काही नाही. शेवटी धैर्य, सकारात्मक विचार आणि पॅरासिटेमॉल या गोळ्या घेऊनही रुग्ण बरे होऊ शकतात.
डॉ. निश्चल सांगतात, महामारीच्या तिसर्या लाटेदरम्यान बहुतांश संक्रमित रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे पाहायला मिळाले आहेत. विशेष असे उपचार न करता त्यांच्यावर घरी राहून उपचार करणे शक्य आहे. सध्याच्या परिस्थितीत ५ ते १० टक्के बाधिक नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासत आहे.
डॉ. निश्चल सांगतात, परंतु परिस्थिती वेगाने बदलू शकते. त्यामुळे नागरिकांनी पूर्ण सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. नुकतेच मंजुरी दिलेले मोलनुपिरावीर हे जादूचे औषध असल्यासारखा सध्या प्रचार केला जात आहे. परंतु असे काहीही नाही. मर्यादित आपत्कालीन वापरासाठी या औषधाला मंजुरी दिली आहे.