सातपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची बुधवारी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर होणाऱ्या जाहीर सभेसाठी सातपूर मनसेने कंबर कसली आहे. सभेसाठी विभागातून १०० वाहनांचे नियोजन केले असल्याची माहिती मनसेचे माजी नगरसेवक सलिम शेख यांनी दिली.
सातपूर विभागाच्या वतीने जाहीर सभेच्या नियोजनानिमित्त आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर, माजी नगरसेवक योगेश शेवरे, कामगार सेनेचे प्रदेश चिटणीस सोपान शहाणे, विभाग अध्यक्ष बंटी लबडे, शहर उपाध्यक्ष विजय अहिरे, सप्तशृंगी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसन खताळे, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना शेख म्हणाले की, राज गर्जना ऐकण्यासाठी राज्यभरातून हजारो मनसैनिक हजेरी लावणार आहे. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला आहे. त्याचअनुषंगाने सातपूरकरांनी सभेसाठी कंबर कसली असून हजारो मनसैनिक हजेरी लावणार आहे. बुधवारी दुपारी एक वाजता जिजामाता मैदानावरून वाहने प्रस्थान करणार असून सर्व मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ नागरिकांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन शेख यांनी केले.
दरम्यान, सातपूरकरांनी केलेल्या नियोजनाचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी कौतुक करत सातपूरकरांचा फॉर्मुला सर्वत्र वापरणार असल्याचे सांगितले. प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडावी असे आवाहनही दातीर यांनी केले. बैठकीस कैलास जाधव, किशोर वडजे, अतुल पाटील, वैभव रौंदळ, विजय उल्हारे, तेजस वाघ, प्रवीण अहिरे, अरुण मिस्त्री, मनोज बोराडे, अक्षय मटाले आदींसह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.