इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मीडिया वापरताना प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकायचे असते, याचे लाख ट्रेनिंग सेशन झाले तरी लोक करायची ती चुक करतातच. विशेषतः ट्वीटरवरून एखाद्या सरकारी संस्थेला टॅग करताना आपली संपूर्ण माहिती देताना तरी आपण जोखीम पत्करतोय, याची जाणीव असायला हवी. एका महिलेला अशीच एक चुक ६४ हजार रुपयांना पडली.
आयआरसीटीसीच्या संदर्भातील अनेक तक्रारी देशभरातून येत असतात. अनेक लोक ट्वीट करून आपल्या अडचणी सांगतात. त्यात सगळी माहिती देतात. एम.एन. मिना नावाच्या महिलेने आयआरसीटीसीला एक ट्वीट करताना आपला मोबाईल नंबरही त्यात टाकला. खरं तर याठिकाणी केवळ पीएनआर नंबर असणेच अपेक्षित आहे. पण मिना यांनी मोबाईल नंबर टाकून सायबर क्राईम करणाऱ्यांच्या हातात कोलीतच दिलं. मिना यांना खरं तर आपलं तिकीट अपडेट करायचं होतं. त्यांनी १४ जानेवारीची चार तिकीटं काढली होती आणि ती सगळी आरएसी होतं. ती अपडेट करण्यासाठी त्यांनी आयआरसीटीसीला ट्वीट केलं. यात पीएनआरनंबर देत त्यांना मोबाईलनंबरही टाकला. सायबर गुन्हेगारांसाठी एवढं पुरे होतं.
फोन सुरू झाले
ट्वीट करताच मिना यांना फोन सुरू झाले. त्यातला एक फोन त्यांनी उचलला. आपण आयआरसीटीसीकडून बोलतोय, असे सांगत गुन्हेगाराने त्यांना एक लिंक पाठवली. या लिंकवर जाऊन मिना यांनी संपूर्ण फॉर्म भरला. यात फक्त दोन रुपयांचं ट्रान्झॅक्शन करायचं होतं. कुठलीही खातरजमा न करता मिना यांनी तेही केलं.
६४ हजार रुपये गायब
मिना यांनी लिंकवर दिलेला फॉर्म भरल्यानंतर दोन रुपयांचं ट्रॅन्झॅक्शन केलं आणि अवघ्या काही सेकंदात त्यांच्या खात्यातून ६४ हजार रुपये गायब झाले. एखादी जादू व्हावी, तसे मिना यांच्या खात्यातून पैसे लंपास झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली, पण आता सायबर गुन्हेगाराचा मोबाईल स्विच्ड अॉफ येतोय.
Railway Ticket Complaint 64 Thousand Rupees Fraud
Cyber Crime IRCTC Online