नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनेकदा रेल्वे प्रवास वेटिंगच्या तिकीटावर करावा लागतो. आणि अशा वेळी विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. पैसे खर्च करुनही सुविधा मिळत नाही आणि सीट मिळण्यासाठी टीसीच्या मागे मागे फिरावे लागते. मात्र, आता या सर्व त्रासापासून प्रवाशांची सुटका होणार आहे.
रेल्वे ही भारताची रक्तवाहिनी समजली जाते. देशभरात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचे आरक्षण करून तिकीट कन्फर्म नसेल तर मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो. यापुढे वेटिंगवर असलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी नवी सुविधा मिळणार आहे.
प्रवाशांच्या हातात कन्फर्म तिकीट असेल तर रेल्वे प्रवास सुखाचा हाेताे. गाडीत टीसीच्या मागे फिरावे लागत नाही. मात्र, आता प्रतीक्षा यादीतील म्हणजेच वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. काेणत्या डब्यात किती जागा रिकाम्या आहेत, ही माहिती प्रवाशांना चार्ट तयार झाल्यानंतर मिळणार आहे. यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर नवी सुविधा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
नवी सुविधा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना माेबाइलवरच कळू शकेल की रेल्वेमध्ये रिक्त जागा किती आहेत आणि कुठे आहेत. आयआरसीटीसीवरून आरक्षित तिकिटे घेतानाच ‘गेट ट्रेन चार्ट’ हा पर्याय निवडण्याचा पर्याय मिळेल. नवी सुविधा सुरू झाल्यानंतर आयआरसीटीसी कडून आलेल्या एसएमएसमधील लिंकवर क्लिक केल्यास चार्ट मिळू शकेल. या सुविधेसाठी किती शुल्क लागेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. याबाबत शुल्क आकारल्यास ५ ते १० रुपयांपेक्षा जास्त राहणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या आआरसीटीसी वेबसाइटवर ट्रेनचा चार्ट मिळविण्याची सुविधा आहे. मात्र, माेबाइलवर ही माहिती मिळत नाही. त्यामुळे प्रवासी टीसीवर अवलंबून असतात.
Railway Passenger Waiting Ticket New Service