अलिबाग (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काही वेळा नात्यातील व्यक्तीच खूनी असतो, परंतु पोलीसांसह कोणालाही त्याचा संशय येत नाही, कोकण रेल्वे फाटकावरील एका गेटमन याच्या खुनाचा तपास लागत नव्हता मात्र अखेर या खूनाचा उलगडा करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. त्याचा खून त्याचा सख्खा मेहुणा यानेच केला असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. फरार आरोपीचा रायगड पोलीस आता शोध घेत आहेत.
२२ कर्मचारी आणि पथकांचा तपास
याबाबत अधिक माहिती अशी की, कोकण रेल्वे फाटका वरील गेटमन चंद्रकांत कांबळे याच्या खुनामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यातच चंद्रकांत कांबळे याच्या खून्याचा शोध लगत नव्हता, त्याचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी करीत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. त्यामुळे पोलीस विभागावर मोठा दबाव वाढून तणाव निर्माण झाला होता. पोलीस खून्याचा शोध घेण्यासाठी मोठा प्रयत्न करत होते. विशेष म्हणजे अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेकडे या गुन्ह्याचा समांतर तपास सोपवण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी तसेच २२ कर्मचारी यांची वेगवेगळी पथके तयार करून विविध अंगाने या गुन्ह्याचा तपास सुरू होता. महत्वाची गोष्ट म्हणजे तपासा दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. खूनी हा बाहेरचा नसून मृताचा नातेवाईकच निघाला.
डोक्यात गोळी झाडली
रेल्वे फाटकावर काम करणारा गेटमन चंद्रकांत कांबळे हा तिसे रेल्वे फाटकावर कार्यरत असताना भरदिवसा त्याच्या डोक्यात गोळी झाडून त्याचा खून करण्यात आला होता. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. खूनाची घटना घडताच अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी तातडीने भेट देवून गुन्ह्याची माहिती घेतली. अंगुली मुद्रा तज्ञ , फॉरेन्सिक तज्ञ, बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक यांनी घटना स्थळाचे निरीक्षण करून मागोवा घेत गुन्ह्याचे पुरावे, खाणाखुणा शोधण्याचा प्रयत्न केला.
यावरुन होता वाद
चंद्रकांत कांबळे याची बहीण विमल शेट्टी व तिचे पती विजय शेट्टी यांच्यात वाद होता. दोघांच्या संयुक्त नावावर असलेले रोहा तालुक्यातील खैरवाडी येथील घर विजय शेट्टी यांना विकायचे होते. त्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. या घराची झाडाझडती आणि पंचनामा केल्यानंतर विजय शेट्टी यानेच चंद्रकांत कांबळे याचा खून केल्याची पुष्टी देणारे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून उलगडा करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. कांबळे याचा खून त्याचा सख्खा मेहुणा विजय शेट्टी यानेच केला. आणखी महत्वाची बाब म्हणज विजय शेट्टी याच्यावर यापूर्वी पनवेल येथे गोळीबार करून दुहेरी खून तसेच पुण्यात मालमत्ता अपहाराचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांना मिळालेल्या पुराव्यावरून शेट्टी यानेच कांबळे याचा खून केल्याचे उघड झाले आहे. रोह्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असून त्यांची ४ पथके फरार आरोपी विजय शेट्टी याचा शोध घेत आहेत.आरोपीला लवकरच जेरबंद करू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र अद्याप त्याला अटक झालेली नाही.
Raigad Crime Relative Murder Gun Shoot Head Bullet
Police Investigation