इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारतीय नागरी सेवा अधिकारी सिद्धार्थ वर्मा यांचा प्रश्नोत्तरांचा आमनासामना चांगलाच रंगला संपूर्ण कार्यक्रमात राष्ट्र आणि राज्याच्या मुद्द्यावर दोघांमध्ये जोरदार प्रश्नोत्तरे झाली. या संपूर्ण चर्चेचा व्हिडिओ अधिकाऱ्याने ट्विटरवर शेअर केला आहे. काँग्रेस नेत्याने ‘इंडिया अॅट ७५’ या विषयावर मत मांडले होते. याच कार्यक्रमात राहूल म्हणाले की, भारत हे राष्ट्र नसून तो राज्यांचा संघ आहे. त्यांच्या या विधानामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे.
अधिकारी सिद्धार्थ वर्मा यांनी ट्विट करत म्हणले की, ‘काल मी केंब्रिजमध्ये राहुल गांधींना त्यांच्या ‘भारत हे राष्ट्र नसून राज्यांचे संघ आहे’ या विधानाबद्दल प्रश्न केला. भारत हे एक राष्ट्र नसून ते राज्यांमधील कराराचे फलित आहे, यावर त्यांनी दुजोरा दिला. व्हिडिओमध्ये वर्मा यांनी, ‘तुम्ही संविधानाच्या कलम १ चा दाखला देत असे म्हणले आहे की भारत राज्यघटनेच्या आधारावर राज्यांचा संघ आहे. प्रथम एखाद्या पानावर जाऊन प्रस्तावना पाहिली तर भारत हे एक राष्ट्र आहे असे लिहिले आहे. भारत ही सर्वात प्राचीन जिवंत संस्कृतींपैकी एक आहे आणि हा शब्द वेदांमध्ये देखील आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘चाणक्य यांनी तक्षशिला येथील विद्यार्थ्यांशी चर्चा केली तेव्हाही त्यांनी स्पष्ट केले की ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले असतील, पण शेवटी ते भारत देशाचेच आहेत.’ त्यावर राहुल गांधींनी उत्तर दिले, ‘त्यांनी राष्ट्र हा शब्द वापरला का?’ त्यावर वर्मा म्हणाले चाणक्य यांनी ‘राष्ट्र’ हा शब्द वापरला होता. यानंतर “एक राजकारणी म्हणून तुम्हाला वाटत नाही की भारताकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन केवळ चुकीचाच नाही तर हजारो वर्षांचा इतिहास लपवण्याचा प्रयत्न करत असल्याने ते विनाशकारी आहे,” असे तिखट वक्तव्यदेखील वर्मा यांनी गांधींना उद्देशून केले. राहुल गांधींसोबतच्या संभाषणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अधिकारी वर्मा यांचे कौतुक होत आहे. लोकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभारही मानले आहेत.