मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका होती. या चित्रपटात तिने अल्लू अर्जुनची गर्लफ्रेंड श्रीवल्लीची भूमिका साकारली होती आणि तिच्यावर चित्रित झालेलं ‘ तेरी झलक अशर्फी… श्रीवल्ली’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले आहे. पुष्पा २ नक्की कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आणि आता याच चित्रपटाबाबत एक माहिती समोर आली आहे.
सुमारे ६ महिन्यांनंतरही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाचं वेड पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. पण सध्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल सोशल मीडियावर भलतीच चर्चा आहे. या भागात श्रीवल्लीचा मृत्यू होणार असं बोललं जात आहे. ज्यावर आता निर्मात्यांनी मौन सोडले आहे.
‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटानंतर याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण दुसऱ्या भागात श्रीवल्लीचा मृत्यू होणार का? अशा चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. आता यावर निर्माता वाय रवी शंकर यांनी एका मुलाखतीत मौन सोडत दुसऱ्या भागात असे काहीच होणार नसल्याचे म्हटले आहे.
वाय रवी शंकर म्हणाले की, या सर्व गोष्टी फक्त अफवा आहेत. अजून आम्ही दुसऱ्या भागाची कथा पूर्ण ऐकलेली नाही. त्यामुळे दुसऱ्या भागात असे काही होणार नाही. हे सर्व फक्त अंदाज आहेत. जर चित्रपटाबद्दल आपल्याला काहीच माहीत नाहीये तर मग अशाप्रकारे काहीही बोलणं चुकीचे आहे.
दरम्यान, अल्लू अर्जुन देखील चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी खूप उत्सुक आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन हा चंदन तस्कराच्या भूमिकेत आहे. पहिल्या भागाच्या अखेरीस त्याचे आणि श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदानाचे लग्न झालेलं दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर आता दुसऱ्या भागात अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांच्यात चांगलीच टक्कर पाहायला मिळणार आहे.
pushpa the rise movie part 2 producer says story rashmika mandhana shreevalli