इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंजाबमधील संगरूरच्या आमदार नरिंदर कौर भाराज यांनी शुक्रवारी आप कार्यकर्ता मनदीप सिंहसोबत लग्न केले. पटियालाच्या रोरेवाल गावात हा विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत गावातील गुरुद्वारामध्ये हा सोहळा संपन्न झाला. त्यात मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पत्नी डॉ.गुरप्रीत कौरही सहभागी झाल्या होत्या.
नरिंदर कौर भाराज या सर्वात तरुण (२८ वर्षे) आमदार आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांनी संगरूरची जागा जिंकली होती. कौर यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी विजय इंदर सिंगला यांचा ३८ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. विजय इंदर हे आधीच्या काँग्रेस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही होते, तरीही नरिंदर कौर यांनी त्यांचा पराभव करून जागा ताब्यात घेतली.
कोण आहेत आप आमदारांचे पती मनदीप सिंह?
मनदीप सिंग हा भवानीगडमधील लाखेवाल गावचा रहिवासी आहे. सिंह यांची गणना पंजाबमधील आपच्या सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये केली जाते. संगरूर विधानसभेत मीडिया प्रभारी म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे. सिंग हे शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. भाराज यांनी पंजाब विद्यापीठ पटियाला येथून एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. त्या २ वेळा ‘आप’च्या जिल्हा युवा अध्यक्षाही होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत, भाराज प्रसिद्धीच्या झोतात आल्या, जेव्हा त्यांनी एकट्याने आपल्या गावात ‘आप’चा बूथ उभारला होता. यानंतर भगवंत मान यांच्या माध्यमातून त्या राजकारणात आल्या.
पंजाबमध्ये ‘आप’ची सत्ता आल्यानंतर काही महिन्यांतच मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आले. मान यांनी ७ जुलै रोजी चंदीगड येथे एका खाजगी समारंभात डॉ. गुरप्रीत कौर यांच्याशी विवाह केला. भगवंत मान यांचा पहिल्या पत्नीपासून ६ वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. या लग्नापासून त्यांना दोन मुले आहेत, जी अमेरिकेत आपल्या आईसोबत राहतात.
Punjab AAP MLA Marry With Party Worker
Politics