पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परीक्षा आणि प्रवेश विभागातील गोंधळावरुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा बैठक चांगलीच गाजली. या बैठकीत सिनेट सदस्यांनी कुलगुरूंसह विद्यापीठ प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अखेर या प्रकरणी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला आहे. प्रभारी कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली प्र कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी अधिसभा झाली.
विद्यापीठ विकास मंचचे अधिसभा सदस्य राहुल पाखरे यांनी परीक्षा आणि प्रवेश विभागातील गोंधळ, विध्यार्थ्यांना होणारा त्रास यावरून प्रस्ताव मांडला. विद्यापीठांच्या कामकाजात सुसुत्रता, पारदर्शकता येऊन विद्यार्थ्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी एक खिडकी योजना, अप्लिकेशन ट्रॅक सिस्टीम सुरू करण्याची सूचना केली. या विषयावरून अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, डॉ.अपूर्व हिरे, बागेश्री मंठालकर, सचिन गोर्डे आदींनी प्रशासनाला धारेवर धरले. सदर मागण्या मान्य करण्याला विद्यापीठाने मान्यता दिली आणि या प्रश्नांना सोडवण्यासाठी तत्काळ एक समिती स्थापन करण्याचा निर्णय कुलगुरूंनी जाहीर केला.
G20च्या निमित्ताने निर्माण होणाऱ्या रोजगार, उद्योग , ज्ञानाची संधीचे दालन विद्यार्थी, संशोधक, नवद्योजकांपर्यंत पोहचवण्यासाठी उपक्रम समिती स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या घेण्यात आला. G20 सह विद्यापीठाच्या २०२१-२२च्या लेखा परीक्षण व अनुपालन अहवालालाही मंजुरी देण्यात आली. विद्यापीठ विकास मंचचे अधिसभा सदस्य सागर वैद्य यांनी G20चा फायदा विद्यार्थी, स्टार्टअप सुरू करणाऱ्या नवद्योजकांना, संशोधकांना व्हावा. G20 देशात योग, संशोधन, शिक्षण, रोजगार, तंत्रज्ञान, भाषा, सेवा, निर्मिती आदी अनेक क्षेत्रात करिअरच्या हजारो संधी आहेत. विश्वातील महत्वाच्या देशांमध्ये असलेल्या करिअरच्या संधी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कळाव्या यासाठी प्रचार, प्रसार कार्यक्रम करणारी “उपक्रम समिती” स्थापन करण्याची मागणी सागर वैद्य यांनी केली. अधिसभा आणि कुलगुरूंनी एकमताने या समिती स्थापनेला मंजुरी दिली.
आगामी वर्षभर नवीन शैक्षणिक धोरण आणि G20चा यशस्वीपणे विद्यार्थी, संस्था, समाजापर्यंत पोहचवणे हाच मुख्य मुद्दा घेऊन विद्यापीठ काम करणार असल्याचे यावेळी कुलगुरूंनी जाहीर केले. यंदा विद्यापीठाचा अर्थसंकल्पात ७९ कोटींची सरप्लस बजेट आलेय. सदरच्या रक्कमेतून आगामी काळात विद्यापीठाच्या नाशिक, नगर येथील उपकेंद्रासाठी अधिकची तरतूद करण्यात यावी अशी सूचना सागर वैद्य यांनी केली. तसेच, या सरप्लस बजेटमधून विद्यार्थी हिताच्या योजना, उपक्रमासाठी वाढीव तरतूद करावी अशी मागणी मंचच्या सदस्यांनी केली.
पुढील वर्षांपासून विद्यापीठाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरू होते आहे. यानिमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रमाणे विद्यापीठाचा अमृत महोत्सव साजरा करावा अशी मागणी राहुल पाखरे यांनी केली. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात “शिक्षिका दिन” साजरा करावा अशी मागणी मंचचे अधिसभा सदस्य विजय सोनवणे यांनी केली.
Pune University Senate Meeting Decisions