पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील ससून जनरल हॉस्पीटल हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी एक रुग्णालय आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांतील नागरिक उपचारासाठी या रुग्णालयात येत असतात. या ठिकाणी डॉक्टरांकडून उपचार करताना रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितले जात होते. परंतु आर्थिक दृष्ट्या ही औषधे आणणे काहींना परवडण्यासारखे नव्हते, त्यामुळे उपचारासाठी लागणारी सामग्री व औषधे यापुढे रुग्णालयातच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे पुण्यात १५०० बेड्सची व्यवस्था असलेले प्रशिस्त रुग्णालय चालविले जाते. या रुग्णालयाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील टॉप १० वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयांपैकी एक असणारे बी.जे मेडिकल कॉलेजसुद्धा याच रुग्णालयाचा भाग आहे.
या संदर्भात बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले की, आमच्या रूग्णालयातील डॉक्टर रूग्णांना आवश्यक औषधे खरेदी करण्यासाठी रूग्णालयाच्या बाहेरी औषध दुकानात (फार्मसीमध्ये) पाठवत होते. त्यामुळे अनेकांना त्यासाठी पैसे जमा करावे लागत होते. त्यामुळे डॉक्टरांनी बाहेरची औषधे लिहून देऊ नयेत यासाठी बीजे मेडीकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलमध्ये आवश्यक औषधांचा साठा करण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी रुग्णालयाने नवीन औषधे खरेदी केली आहेत आणि जुनी अपग्रेड केली आहेत, डॉक्टरांना अद्ययावत औषधे उपलब्ध आहेत, याची खात्री करून दिली आहे.
आता रूग्णांना स्वतःची औषधे, सिरिंज किंवा इतर वैद्यकीय साहित्य खरेदी करावे लागणार नाही, याची खात्री करण्यासाठी रूग्णालयात २५५ आवश्यक औषधे आणि ४८० वारंवार लिहून दिलेली औषधे आता रुग्णालयाकडूनच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता सगळ्यांना मोफत औषधे मिळणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील अनेक भागातून ससून रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण येत असतात. उत्तम आणि कमी खर्चात उपचार होतात. त्यामुळे अनेक आर्थिक दृष्ट्या सक्षम नसणारे नागरीक रुग्णालयात उपचारासाठी जास्त प्रमाणात येतात. सगळेच रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक पुण्यातील नसून बाहेरील शहरातील असतात. त्यामुळे त्यांना शहरासंदर्भात फार माहिती नसते, त्यामुळे त्यांनाही त्रास सहन करावा लागतो. या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून याबद्दल रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे.
pune sasoon hospital medicines patient Relief