पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी पुणे-नाशिक औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्प राबविण्याचे निश्चित झाले आहे. याचाच एक भाग म्हणून आता या प्रकल्पाला चालना दिली जात आहे. या प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC)कडे देण्यात आले आहे. त्यामुळेच महामंडळाने आता हालचाली गतिमान केल्या आहेत.
महामंडळाने प्रस्तावित पुणे-नाशिक औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पासाठी पुण्यामधील सल्लागाराची नियुक्ती केली आहे. या सल्लागाराद्वारे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांचे सर्वेक्षण, जमीन ओळखणे आणि संबंधित विकास प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे काम केले जाणार आहे.
सल्लागार नियुक्तीमुळे आता या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. मोनार्क सर्वेअर्स आणि अभियांत्रिकी या सल्लागार कंपनीला हे काम देण्यात आले आहे. सर्वेक्षण आणि डीपीआर पूर्ण करण्यासाठी या कंपनीला ९ ते १२ महिन्यांचा कालावधी लागेल अशी अपेक्षा आहे.
कंपनीकडून डीपीआर महामंडळाला सुपूर्द होईल. त्यानंतर महामंडळाकडून त्यासंदर्भात राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला जाईल. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर भूसंपादन सुरू होईल. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या सर्वेक्षणाच्या कामात आणि इतर पायाभूत कामांमध्येही मोनार्कचा सहभाग आहे. हा कॉरिडॉर आळंदी परिसरातील पुण्याच्या प्रस्तावित रिंग रोडला जोडला जाईल आणि दुसऱ्या टोकाला तो समृद्धी महामार्ग आणि सुरत-चेन्नई एक्स्प्रेस वे याच्याशी जोडला जाईल.
चेन्नई-सूरत एक्सप्रेस वे हा तब्बल १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात येणार आहे. सहापदरी हा असणारा हा माहामार्ग १८ किलोमीटर लांबीचा असेल. हा एक्स्प्रेस वे पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांमधून जाईल. या तिन्ही जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास यामुळे होणार आहे. तसेच, कार्गोची जलद वाहतूक तो सक्षम करेल.
पुणे किंवा अहमदनगर येथून नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरात पाठवल्या जाणार्या मालाची किंवा शेतीमालाची वाहतूक प्रस्तावित औद्योगिक कॉरिडॉरचा वापर करेल आणि नंतर बंदरात पोहोचण्यासाठी समृद्धी महामार्गामध्ये प्रवेश करेल.
त्याचप्रमाणे गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे मालवाहतूक करणे सुलभ होईल. पुढे, या प्रकल्पामुळे तीन जिल्ह्यांमध्ये बंदर तसेच दक्षिणेकडील राज्यांशी मजबूत कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासाठी नवीन गुंतवणूक आकर्षित होण्याची अपेक्षा आहे.
Pune Nashik Industrial Corridor MSRDC Consultant