मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील प्रश्न सोडविण्यासंदर्भात शाळांची तपासणी मोहीम राबविणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. सदस्या माधुरी मिसाळ यांनी पुणे महापालिकेच्या शाळांच्या समस्यांबद्दल लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे मराठी, इंग्रजी, उर्दू व कन्नड माध्यमाच्या एकूण 272 प्राथमिक शाळा आहेत. यापैकी मराठी माध्यमाच्या 185, उर्दू माध्यमाच्या 33, इंग्रजी माध्यमाच्या 52 व कन्नड माध्यमाच्या दोन शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये मिळून एकूण शिक्षकांची मंजूर पदे 2,425 असून त्यामधील 352 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांची भरती प्रक्रिया शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात येणार असून याबाबत कार्यवाही सुरू आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत ही पदे भरण्यात येतील. ज्या शाळांमध्ये मुला-मुलींसाठी वेगळी स्वच्छतागृह नाहीत. अशा शाळांवर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य संजय केळकर यांनी सहभाग घेतला.
pune municipal corporation schools state government
maharashtra assembly monsoon session