पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील ऐतिहासिक लाल महालात चक्क लावणीचा कार्यक्रम आयोजित केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संभाजी ब्रिगेडने तक्रार केल्यानंतर फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवरुन अनेक स्तरातून तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल महलामध्ये लावणीचा आयोजन केल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडच्यावतीने प्राप्त झाली होती. त्याची चौकशी केली असता पोलिसांनी अनेक बाबी निदर्शनास आल्या आहेत. याप्रकरणी अभिनेत्री वैष्णवी पाटील, केदार अवसरे, मानसी पाटील आणि कुलदीप बापट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही याप्रकरणी ट्विट करुन आक्षेप नोंदवला होता. ऐतिहासिक वास्तूमध्ये असा प्रकार कसा सुरू राहू शकतो, असा सवाल विचारला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य असलेली ही वा्स्तू अतिशय पवित्र आणि महान इतिहास असलेली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी लावणी सारखे प्रकार कसे, होऊ शकतात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लाल महलामध्ये महापालिकेची सुरक्षा व्यवस्था आहे. या सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून लावणीचे शुटींग केल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, इन्स्टाग्रामवर रिल्स शेअर करण्यासाठी ही लावणी आयोजित करण्यात आली. वैष्णवी पाटील यांनी ही लावणी सादर केली तर कुलदीप बापट यांनी या लावणीचे शुटींग केल्याचे सांगण्यात आले आहे.