पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. विविध कारणांमुळे पुणे, पुणेकर आणि पुण्यातील घटना नेहमीच चर्चेत असतात. आताही अशीच एक अनोखी घटना घडली आहे. दारात बकरी बांधली आणि तिच्या आवाजाचा त्रास होतो, या कारणावरुन पुण्यातील शिवाजीनगर भागाजवळ वाद झाला. तक्रारदार आणि बकरी बांधणारा अल्पवयीन मुलाचा हा वाद टोकाला गेला असून आता थेट खडकी पोलिस ठाण्यात पोहोचला आहे.
तक्रारदार आणि अल्पवयीन मुलगा खडकी परिसरात एकमेकांच्या शेजारी राहतात. या प्रकरणी संबधित अल्पवयीन मुलाविरूध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शिवाजीनगर येथील महात्मा गांधी वसाहतीत राहणार्या एका ३५ वर्षीय युवकाने खडकी पोलिस ठाण्यात एका अल्पवयीन मुलाविरूध्द तक्रार दिली आहे. अल्पवयीन मुलगा तक्रारदाराच्या घरासमोर बकरी बांधत होता. या बकरीचा आणि तिच्या आवाजाचा त्रास होत असल्यामुळे तक्रारदाराने अल्पवयीन मुलाला बकरी घरापुढे का बांधली असा जाब विचारला. यातून दोघांमध्ये वादावादी झाली आणि त्याचे रुपांतर मारहाणीतदेखील झाले. हा सगळा प्रकार वाढत गेल्याने युवकाने थेट पोलिस स्टेशन गाठत पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ठाण्यात बोलावून त्याची समजूत काढली. बकरीमुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितली.
पोपट वारंवार शिट्टी मारतो या कारणाने पोपटाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. पोपटाचा त्रास होत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली होती. अकबर अमजद खान असं गुन्हा दाखल झालेल्या पोपटाच्या मालकाचं नाव असून सुरेश अंकुश शिंदे (वय ७२) यांनी या बद्दल पोलिसात तक्रार दिली होती. शिंदे आणि खान हे दोघे ही हे महात्मा गांधी वसाहत, तुळशी मार्केट शेजारी, शिवाजीनगर, शेजारी राहायला आहेत. अकबर यांनी एक पोपट पाळला आहे. हा पोपट वारंवार शिट्या मारत होता. याचा त्रास होत असल्याची तक्रार दिल्यानंतर अकबर यांच्यावर पुण्यातील खडकी पोलिस ठाण्यात भादवि. ५०४, ५०६ प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
Pune Interesting News Goat Tie ahead of Home