पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर पुणेकर असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचे वृत्त आहे. पुण्यात नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याचे निष्कर्ष पुणेकरांची चिंता वाढविणारेच आहेत. हे सर्वेक्षण नेमके काय आहे, त्याचे निष्कर्ष का आहेत हे आपण आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत…
रोज सकाळी उठल्यावर टिव्हीवरील बातम्या, सिनेमा व मालिका यातून ज्या पद्धतीच्या नकारात्मक भावना दिसतात, त्या बघितल्यावर कोणाला आनंद होईल? पेन्शनर, निवृत्त मंडळी ज्यांची मुले-मुली परदेशी किंवा दूर आहेत, त्यांना सतावणारा एकटेपणा व त्यातून घडणारे विचित्र प्रकार, हे आजूबाजूच्यांनाही त्रासदायक होतात. मोबाइल व टीव्हीला जवळ करणारे लोक कोणत्याही वयाचे असले तरी एकटे पडतात. पुण्यात अशा घटना घडल्या आहेत, ज्यात काही एकटे वृद्ध मृतावस्थेत आढळून आले. कारण त्यांची मुले परदेशी होती.
पैसा असूनही जिव्हाळ्याची माणसे जवळ नसणे यासारखे दु:ख नाही. जगात सर्वत्र एकटेपणाचे प्रमाण वाढले आहे, मात्र भारतात एवढी प्रचंड लोकसंख्या असताना जर आपल्याला मन मोकळे करण्यासाठी माणसे मिळत नसतील, तर नक्कीच आपण आनंदी नाही. अमेरिकेतही काहीशी अशीच स्थिती असून सोशल मीडियाचा अतिवापराने अमेरिकनांच्या आनंदात विरजण पडले आहे.
पुणे शहरातील प्रत्येक पाच व्यक्तींपैकी चार व्यक्तांना मानसिक आरोग्याच्या समस्येने ग्रासले आहे. सुमारे 80 टक्के रहिवाशांना मानसिक आरोग्याची समस्या जाणवत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. मानसिक आरोग्य सेवा प्रदाता एमपॉवर आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या पुढाकाराने अलीकडेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांचे याविषयी सर्वेक्षण केले. यात ही बाब उघड झाली आहे.
पुण्यातील 85 टक्के स्त्रिया आणि 70 टक्के पुरुषांना मानसिक आरोग्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे आणि नैराश्य हे स्त्रियांमध्ये सर्वात मोठे कारण आहे. तर चिंता आणि पॅनिक डिसऑर्डर हे पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून आले आहे. एमपॉवर पुणे मेंटल हेल्थ स्कोअरने 18 ते 24 वर्षे वयोगटातील (युवक आणि किशोरवयीन) 25 ते 40 वर्षे (प्रौढ आणि कार्यरत लोकसंख्या) आणि 60 वर्षे आणि त्यावरील वृद्ध लोकसंख्या असलेल्या निष्कर्षांचे मूल्यांकन केले.
या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात, एमपॉवरच्या संस्थापक आणि अध्यक्षा, डॉ. नीरजा बिर्ला म्हणाल्या, की एमपॉवर येथे आम्ही भारतातील मानसिक आरोग्याच्या चिंतेबद्दल जागरूकता निर्माण करणे, गरजू लोकांना मदत आणि सेवा मिळविण्यासाठी योग्य व्यासपीठ प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे. शहर-विशिष्ट मानसिक आरोग्य स्कोअरच्या लाँचद्वारे आम्ही प्रत्येकाला हे लक्षात आणू इच्छितो, की मानसिक आरोग्य आता दुर्लक्ष करता येणारा विषय नाही. मानसिक आरोग्याचा त्रास कोणत्याही वयोगटातील आणि आजूबाजूला कोणालाही होऊ शकतो.
गेल्या काही वर्षांत भारतातील आर्थिक विषमता ही वेगवेगळ्या कारणाने वाढली आहे. त्यात करोनाच्या गोंधळाची भर पडली. त्यामुळे कामगार वर्गाचे आर्थिक आरोग्य बिघडले. त्याचा थेट परिणाम सामाजिक, शारीरिक व आर्थिक आरोग्यावर झाला. करोना काळात भारतीय आरोग्य व्यवस्थेचे जे भयावह रूप जगासमोर आले, ते धडकी भरवणारे होते. या सर्व कारणांनी त्रस्त असलेले भारतीय आनंदापासून दूर गेले आहेत. आर्थिक कारणांनीसुद्धा आयुष्यातील समाधान व आनंद कमी झाला आहे.
भारतातील ७० टक्के जनता १५० रुपये रोजंदारीवर आयुष्य काढते आणि ३० टक्के जनता दिवसाला १०० रुपयात भागवते. अशा परिस्थितीत आनंद कुठे शोधावा? आर्थिक विवंचना, जाती धर्माच्या नावावर वाढलेली दरी, त्यातून आलेला संशयीपण व एकटेपणा, सोशल मीडियाचा आधार घेत जगणे, अशा वेगवेगळ्या कारणांनी भारतीयांचा आनंदापासूनचा दुरावा वाढला आहे.
सोशल मीडियामुळे तुलना वाढून ईर्ष्या व असूया वाढत आहे. भारतात अजूनही पैसा असला की, आनंद येतो असा समज रूढ आहे. त्यामुळे सतत पैशाच्या मागे धावणे आणि त्याच्याशी संबंधित आयुष्याचे आराखडे बांधणे, यामुळे भारतीय छंद व मनोरंजन या दोन्ही गोष्टींमधला फरक समजू शकत नाहीत. क्रिकेट हा आपला राष्ट्रीय छंद आहे, कारण क्रिकेट खेळणे व बघणे, याशिवाय बहुतेक पुरुष मंडळींना दुसरा छंद माहीत नसतो.
सध्या सुरू असलेला साथीचा रोग आणि विलगीकरण, अस्थिरता आणि चिंता यांच्या प्रभावामुळे आपल्यापैकी अनेकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.या त्रासाला सामोरे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हे मान्य करणे आणि योग्य व्यावसायिक मदत घेणे म्हणजेच समुपदेशन हा होय. कारण मानसिक आरोग्याच्या समस्यांसह जगणे केवळ एखाद्याच्या आनंदाचे जीवनच नकारात्मक नाही करत तर त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. कारण या बाबी अप्रत्यक्षपणे उत्पादकता आणि वाढीस बाधित करतात, असे बिर्ला म्हणाल्या.
दरम्यान, या सर्वेक्षणातून आणखी काही बाबी समोर आल्या आहेत. जसे की, 18 ते 24 वयोगटातील 88 टक्के तरूण मानसिक आरोग्याच्या चिंतेने ग्रस्त आहेत. पुण्यातील तरुणांमध्ये दिसणाऱ्या काही प्रमुख मानसिक आरोग्यावरील ताण म्हणजे मूड डिस्टर्बन्स आणि चिंता. अनेकांना पॅनिक डिसऑर्डर, अस्थिरता, गैरवर्तन आणि खुल्या नातेसंबंधांच्या समस्यांचा त्रास होतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
Pune City Survey Study Findings Health