पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गेल्या महिन्यात चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. शिवाय आता पुण्यात वाहतुकीची समस्याच राहणार नसल्याचा भक्कम दावा राजकीय नेत्यांकडून करण्यात आला. तसेच, या उड्डाणपुलाचे श्रेय घेण्यावरुन मोठा राजकीय ड्रामाही रंगला. हे सर्व केल्यानंतरही प्रत्यक्षात चांदणी चौक परिसरातील परिस्थितीत तसूभरही फरक पडलेला नाही. वास्तविक वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुणेकरांना अनेकानेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
गेल्या १२ ऑगस्ट रोजी चांदणी चौक पुलाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दावा करण्यात आला की,
पुणे शहरात एनडीए चौकातील राष्ट्रीय महामार्ग क्र.48 वर सर्व मार्गिकांसहित एकूण 16.98 किलोमीटर लांबीचा पायाभूत सुविधा व रस्ते विकास प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पाची किंमत 865 कोटी असून प्रकल्पामुळे परिसरात अखंड आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे.
पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक सहा पदरी करण्यात आली असून अंतर्गत आणि बाह्य सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच 8 वेगवेगळ्या मार्गिकांची उभारणी करण्यात आली आहे.
मुळशी-सातारा, मुळशी-मुंबई, मुळशी-पाषाण, सातारा/कोथरूड-मुळशी, पाषाण-मुंबई, पाषाण-सातारा, सातारा/कोथारूड-पाषाण आणि मुख्य रस्त्यावरून सेवा रस्त्याकडे अशा आठ मार्गिका आहेत.
एनडीए ते पाषाण ओव्हरपास आणि पाषाण ते मुंबई तसेच सातारा/कोथरूड ते मुळशी असे दोन अंडरपासही करण्यात आले आहेत.
एनडीए चौकात येणारी सर्व बाजूंची वाहतूक सिग्नलमुक्त करण्यात आली आहे. जून्या पुलाच्या ठिकाणी नवा विस्तारीत पूल उभारण्यात आला आहे. परिसराचे सुशोभिकरणही करण्यात येत आहे.
खेड आणि मंचर येथील वळण रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाची लांबी 14.137 किलोमीटर असून प्रकल्पाची किंमत 495 कोटी आहे.
अशी आहे सद्यस्थिती
आमदार सत्यजित तांबे म्हणाले…
विधान परिषदेतील अपक्ष आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, ‘आयटी हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात ट्राफिकच्या समस्येमुळे मागील काही वर्षांत बऱ्याच आयटी कंपन्या पुणे सोडून गेल्या होत्या. तरी देखील अजूनही शहरातील ट्रॅफिकचं चित्र तसंच असल्याचं दिसतंय. चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन तर झाले, मात्र परिस्थिती अजून बिकट झालेली दिसतेय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 397 कोटी खर्च करून 8 रॅम्प, 2 सर्व्हिस रोड, 2 अंडरपास, 4 पूल असे 17 किलोमीटर रस्त्याचे काम केलेले आहे. मात्र या रस्त्यांवर काही ठिकाणी मार्गदर्शक फलक आहेत, तर काही ठिकाणी फलक लावलेले दिसत नाहीत. यामुळे वाहनचालकांना रस्ता समजत नाही आणि जेथे फलक लावले आहेत ते दिसत नाहीत. रस्ता चुकला की नागरिकांना दोन-दोन किलोमीटर फिरून यावं लागत आहे. नवीन रस्ते झाले असले तरी पादचाऱ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतोय, तसेच सर्व दिशांनी एकत्र येणाऱ्या अनेक रस्त्यांमुळे अपघाताची भीतीही वाढली आहे. त्यामुळे फक्त वाहतूक कोंडीच नाही, तर लोकांची मानसिक कोंडी देखील होतेय. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी अवाढव्य खर्च करून नवीन रस्त्यांचा अट्टहास केला असला तरी समस्या काही सुटलेली दिसत नाही. हे सर्व बघता शहर विकासाला नियोजनाची जोड देणे, ही प्राथमिक गरज आहे हे स्पष्टपणे दिसतंय, असे तांबे यांनी म्हटले आहे.
मनसेचे पदाधिकारी अभिजीत चौगुले यांनी दोन व्हिडिओ शेअर करुन वस्तुस्थिती दाखवली आहे
Pune City Chandani Chowk Flyover Traffic Jam Video