पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट आजारी असतानाही प्रचाराच्या मैदानात उतरले. थेट ऑक्सिजन नळी लावून व्यासपीठावर आले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. प्रचंड आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांना प्रचाराच्या मैदानात उतरवून भाजप त्यांच्या जीवनाशी खेळ करत असल्याची टीका जगताप यांनी केली आहे.
राज्यातील पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार प्रचार करीत आहे.आतापर्यंत निवडणूक प्रक्रियेपासून लांब असलेले बापट प्रचारासाठी पुढे आले आहेत. ते ऑक्सिजन सिलेंडरसह व्यासपीठावर आले. यावेळी पुणेरी पगडी आणि पुष्पगुच्छ देऊन भाजपा नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं. पण नाकात ऑक्सिजनची नळी असताना गिरीश बापट यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्या हातालाही ऑक्सिमीटर लावण्यात आला होता. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे.ते मागील अनेक दिवसांपासून एका मोठ्या आजाराशी लढा देत आहेत.
https://twitter.com/NCPspeaks/status/1626536110766837766?s=20
‘पराभव दिसताच आठवण’
या संपूर्ण प्रकारानंतर व्हिडीओ पुढे आणत प्रशांत जगताप यांनी भजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, मुळात गिरीश बापट यांची प्रकृती अस्वस्थ आहे. त्यांना त्रास होत असताना, इतर व्हायरल संसर्गापासून त्यांना दूर ठेवा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तरीही भाजपाच्या नेतृत्वाने त्यांना प्रचाराला येण्यासाठी गळ घातली.मागील पाच वर्षापासून भाजपाच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेतून गिरीश बापट यांना बाजुला का ठेवण्यात आले? भाजपाच्या कुठल्याही कार्यक्रमात, मेळाव्यात गिरीश बापट यांचा साधा फोटो लावण्याचे औदार्यही भाजपाने दाखवले नाही. पण आज कसबा मतदारसंघातील भाजपाचा उमेदवार अडचणीत आल्यानंतर राज्याच्या आणि देशाच्या नेतृत्वाला गिरीश बापट यांची आठवण झाली. हे एकूणच भाजपाच्या पराभवाचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1626254534791278592?s=20
Pune BJP MP Girish Bapat Election Campaign Oxygen Support