पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिंद्रा अँड महिंद्रा महाराष्ट्रात १० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. कंपनी पुण्यात इलेक्ट्रिक वाहन उत्पादक प्लांट उभारणार असून, याला महाराष्ट्र शासनाकडून औद्योगिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मान्यताही मिळाली आहे.
महिंद्रा ग्रुपचे सीईओ आणि एमडी अनिश शाह यांनी नुकतीच याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आमच्या उद्योगाला हिरवा कंदील मिळाला आहे. महिंद्राच्या नवीन EV उत्पादन युनिटने मेक इन महाराष्ट्रद्वारे परदेशी गुंतवणूक आणि तंत्रज्ञान आणले आहे. तसेच EV सहायक युनिट्ससाठी दरवाजे उघडले आहेत. असं ते ट्वीट करून म्हणाले असून त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहे. अनिश शाह यांच्या ट्विटला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले आहेत की, महाराष्ट्र हे महिंद्राचे गृहराज्य आहे. इथे नाही तर कुठे, असं ते आनंद महिंद्रा यांना टॅग करत म्हणाले आहेत. ते म्हणाले, उद्याच्या ग्रीनरीसाठी, स्वच्छतेसाठी सर्वोत्कृष्ट काम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. सशक्त महाराष्ट्र सशक्त भारतासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक असल्याचं म्हणत त्यांनी महिंद्रा कंपनीला शुभेच्छा दिल्या आहेत.
देशाच्या व राज्याच्या इलेक्ट्रॉनिक व्हेईकल पॉलिसीनुसार देशातील इलेक्ट्रीक व्हेईकल निर्मितीच्या क्षेत्रातील दहा हजार कोटींची गुंतवणूक असलेला महिंद्रा इलेक्ट्रीक व्हेईकल ऑटोमोबाईल्स पहिला प्रकल्प पुणे येथे सुरू होणार आहे. या माध्यमातून राज्यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारीत घटकामध्ये विदेशी गुंतवणूक होणार असून, व्होक्सवॅगन यांच्याबरोबर तंत्रज्ञान विषयक तसेच पुणे या ठिकाणी तंत्रज्ञान, संशोधन व विकास संदर्भात प्रोटोटाईप बनविण्यात येणार आहे. यामुळे राज्यात ईलेक्ट्रीक व्हेईकल निर्मिती संदर्भात IP (Intellectual property) (बौद्धिक संपदा) तयार होत असून, त्याची व्याप्ती “मेड इन महाराष्ट्र” अशी होईल. या प्रकल्पामुळे सभोवतालच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सहयोगी उद्योगांची निर्मिती होईल.
दरम्यान, महिंद्राच्या पुणे प्लांटच्या निर्मितीसाठी ७ ते ८ वर्षांचा कालावधी लागू शकतो. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीदेखील होणार आहे. याशिवाय कंपनी ५ इलेक्ट्रिक कार देखील लॉन्च करणार आहे. त्यातील पहिली इलेक्ट्रिक कार २०२४ मध्ये लॉन्च होऊ शकते.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1603778151204630529?s=20&t=tm4jJ6qks_CmUM3sVqj3OlMBBl5yK8S1hO0THYIHhHI
Pune 10 Thousand Crore Investment Electric Car
Industry Mahindra Development