नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सार्वजनिक ठिकाणी हातगाडीवर अश्लिल सीडी विक्री करणाऱ्या विक्रेत्यास जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सन.२०११ मध्ये भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय नं.५ चे न्या. एम.एम.गादिया यांच्या न्यायालयात चालला.
सोमनाथ विश्वनाथ कोळपकर (रा.जुनी तांबट लेन,भैरवनाथ मंदिरा शेजारी भद्रकाली) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोळपकर हा वर्दळीच्या शालिमार भागात हातगाडीवर आॅडिओ आणि व्हिडीओ सीडी विक्रीचा व्यवसाय करायचा. २६ जुलै २०११ रोजी सायंकाळच्या सुमारास देवीमंदिर परिसरातील सार्वजनिक ठिकाणी तो अश्लिल सीडी विक्री करतांना आढळून आला होता. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील अश्लिल आणि विभत्स असलेल्या सीडी जप्त करीत भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या गुह्याचा तपास तत्कालीन पोलिस नाईक आर.ई.सय्यद यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. जिल्हा व सत्र न्यायालयात चाललेल्या या खटल्यात सरकार तर्फे अॅड.एस.आर.सपकाळे यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदारांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस दोषी ठरवत त्यास सीआरपीसी कलम २४८ (२) अन्वये भादवी कलम २९२ मध्ये तीन महिने सश्रम कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
Public Place Porn CD Sale Court Sentence