नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, १८ जुलैला मतदान होणार आहे. २१ जुलैला देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएकडे ४८ टक्के मत आहेत. तर वायएसआर काँग्रेस, एआयडीएमके आणि बीजेडीकडून एनडीएला उर्वरित मत मिळणार आहेत. एनडीएने निवडलेले उमेदवारच राष्ट्रपती होतील, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. तरीही इतर पक्षांकडून पाठिंबा मिळविण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.
राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराबाबत इतर पक्षांशी चर्चा करण्यासाठी भाजपने पक्षप्रमुख जे. पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांंची नियुक्ती केली आहे. सर्वसंमतीने उमेदवार निवडला जावा याचे संकेत भाजपकडून मिळत असून, त्यासाठीच हे प्रयत्न सुरू झाले आहेत.
भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांकडे ४८ टक्के मत (१०.८६ लाख मतांपैकी ५.२६ लाख मत) आहेत. त्यांना बीजेडी (३१ हजारांहून अधिक मत), वायएसआर काँग्रेस (४३ हजारांहून अधिक मत), एआयडीएमके (१५ हजारांच्या आसापास मत) यांची आवश्यकता आहे. या पक्षांनी भाजप पुरस्कृत उमेदवाराला मतदान करणार असल्याचे यापूर्वीच आश्वासन दिले आहे.
परंतु बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हालचाली पाहून भाजपच्या गोटात काळजीचे वातावरण आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले आहे. तसेच राष्ट्रपतिपदासाठी नितीश कुमार हे योग्य उमेदवार आहेत, असे मत त्यांचे सहकारी मंत्री श्रवण कुमार यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते.
भाजपने २०१७ मध्ये राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यासाठी ७,०२,०४४ मत मिळविले होते. परंतु सध्या एनडीएकडे एकूण ५.२७ लाख मत आहेत. राष्ट्रपतिपदासाठी लोकसभा, राज्यसभा आणि विधनासभेचे सदस्य मतदान करतात. भाजपकडे सध्या फक्त लोकसभेतच बहुमत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून इतर पक्षांची मदत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.