नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, गुरुवारी मलावीच्या लिलाँगवे येथे पोहोचल्या. राष्ट्रपती सध्या अल्जेरिया, मॉरिटानिया आणि मलावी दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. या दौऱ्यात कामुझू आंतरराष्ट्रीय विमानतळावर मलावीचे उपाध्यक्ष मायकेल उसी, आणि इतर मान्यवरांनी राष्ट्रपती मुर्मू यांचे स्वागत केले.राष्ट्रपतींचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले, यावेळी मुलांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच विमानतळावर पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
मलावीला भारताच्या वतीने पहिल्यांदाच राष्ट्रपतींनी भेट दिली आहे.राष्ट्रपतींसमवेत राज्यमंत्री सुकांत मजुमदार आणि खासदार मुकेशकुमार दलाल आणि अतुल गर्ग मलावी येथे गेले आहेत. या दौऱ्यामध्ये राष्ट्रपतींनी भारत-मलावी उद्योग बैठकीला उपस्थित राहून संबोधित केले.यावेळी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, मलावी हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आणि सुपीक शेतजमिनीने समृद्ध देश आहे. दुसरीकडे, भारतामध्ये प्रचंड मोठा ग्राहकवर्ग असून ऊर्जा, खनिजे आणि अन्न यांना भारतात वाढती मागणी आहे. विविध क्षेत्रात समन्वय साधण्यासाठी उभय देश एकत्र येऊ शकतात.कृषी, खनिजे, ऊर्जा, पर्यटन इत्यादी क्षेत्रात आपल्यामध्ये सहकार्य वृद्धिगंत करण्यासाठी भरपूर संधी आहेत .
भारत आणि मलावी यांच्यातील द्विपक्षीय व्यापार वाढत असल्याचे पाहून राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. भारत सध्या मलावीचा चौथा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. विविध क्षेत्रांमध्ये ५०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या गुंतवणुकीसह भारत मलावीमधील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या की, भारत-मलावी भागीदारी केवळ सरकारांपुरती मर्यादित नाही.कारण आफ्रिका हे व्यापार आणि गुंतवणुकीचे महत्त्वाचे ठिकाण म्हणून उदयास आले आहे. भारताचे खाजगी क्षेत्रही यासाठी प्रोत्साहन देण्यात आघाडीवर आहे. आफ्रिकेत बहुराष्ट्रीय आणि एसएमई या दोन्हीमध्ये भारतीय कंपन्यांची विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढत आहे.
भारत-मालवी उद्योग बैठकीत झालेली चर्चा उभय देशांमधील व्यावसायिक संबंध विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.राष्ट्रपती मुर्मू यांच्या मलावी भेटीनिमित्त सायंकाळी आयोजित स्वागत समारंभामध्ये राष्ट्रपती भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींना संबोधित करतील.