नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान सुरू होण्याबाबत घोषणा करण्यात आली आहे. उद्यान उत्सव-II च्या अंतर्गत अमृत उद्यान, 16 ऑगस्ट 2023 पासून एका महिन्यासाठी (सोमवार वगळता) नागरिकांसाठी खुले होणार आहे. 5 सप्टेंबर रोजी, शिक्षक दिनानिमित्त ते केवळ शिक्षकांसाठीच खुले असेल.
अभ्यागतांना, उन्हाळ्यातील वार्षिक फुलांचे दर्शन घडवून आणणे हा या उद्यान उत्सव-II चा हेतू आहे. अभ्यागत, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत (अंतिम प्रवेश दुपारी 4 वाजेपर्यंत) या उद्यानाला भेट देऊ शकतात. अभ्यागतांना उत्तर मार्गाजवळील राष्ट्रपती भवनाच्या प्रवेशद्वार क्रमांक 35 मधून प्रवेश दिला जाईल.
प्रवेशासाठी, 7 ऑगस्ट 2023 पासून राष्ट्रपती भवनाच्या (https://visit.rashtrapatibhavan.gov.in/) या संकेतस्थळावरून ऑनलाइन बुकिंग करता येईल. थेट प्रवेशासाठी अभ्यागतांना प्रवेशद्वार क्रमांक 35 येथील सेल्फ सर्व्हिस किऑस्क (स्वयं सेवा सुविधा) च्या माध्यमातून पास मिळू शकतात. अमृत उद्यानात प्रवेश विनामूल्य आहे.
चालू वर्षी, 29 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत उद्यान उत्सव-1 अंतर्गत अमृत उद्यान खुले करण्यात आले होते त्यावेळी या उद्यानाला 10 लाखांहून अधिक नागरिकांनी भेट दिली होती. या अमृत उद्यानासोबतच, अभ्यागत राष्ट्रपती भवनाच्या (https://visit.rashtrapatibhavan.gov.in/) या संकेतस्थळावरून उपलब्ध जागा ऑनलाइन बुक करून राष्ट्रपती भवन संग्रहालयालाही भेट देऊ शकतात. या उद्यान उत्सव-2 दरम्यान, सरकारी शाळांचे विद्यार्थी संग्रहालयाला मोफत भेट देऊ शकतात.