नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ओडिशा दौरा सध्या चर्चेत आहे.. यापूर्वी एका कार्यक्रमादरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने मोठा वाद झाला. आता एकाने राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढल्याची बाब पुढे आली आहे. याची गंभीर दखल घेत मयूरभंजच्या मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याने (CDMO) फार्मासिस्टला निलंबित केले आहे.
फार्मासिस्ट जशोबंत बेहरा याने राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढला. तसेच तो फेसबुकवर पोस्ट केला. त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली. सीडीएमओ डॉ. रुपभानू मिश्रा यांनी बेहरा याला निलंबित केले आहे. बेहरा ५ मे रोजी सिमिलीपाल नॅशनल पार्कच्या भेटीदरम्यान राष्ट्रपतींच्या वैद्यकीय पथकात तैनात होते.
फार्मासिस्ट म्हणाला…
निलंबनानंतर स्पष्टीकरण देताना बेहरा म्हणाला की,, “मी माझ्या फेसबुक अकाऊंटवर फक्त आठवणी आणि आनंदासाठी काही फोटो टाकले होते. हे करण्यामागे माझा दुसरा कोणताही हेतू नव्हता. मात्र, हेलिकॉप्टरच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या हवाई दलाच्या काही जवानांची मी तोंडी परवानगी घेतली होती. राष्ट्रपतींसारखे महान व्यक्तिमत्व जिल्ह्यात आले होते आणि मी हेलिपॅडवर ड्युटीवर होतो, त्यामुळे आठवण म्हणून काही चित्रे ठेवावीशी वाटली. हेलिकॉप्टरजवळून मोबाईल फोनच्या कॅमेऱ्याने ही छायाचित्रे टिपण्यात आली आहेत.
वीज खंडित झाल्याने हल्लाबोल
दरम्यान, राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झालेल्या महाराजा श्रीरामचंद्र भांजा देव विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात वीजपुरवठा खंडित झाला. या प्रकरणाला विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाने (भाजप) आक्रमक भूमिका घेतली आहे. देशाच्या प्रथम नागरिकाचा दीक्षांत समारंभात समावेश करावा, अशी मागणी करत राजकीय वळण घेतले आहे. भाषणादरम्यान राष्ट्रपतींना सुमारे नऊ मिनिटे अंधारात ठेवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
या प्रकरणी मयूरभंज जिल्हा दंडाधिकारी आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री बिशेश्वर तुडू यांनी केली आहे. भाजपच्या मयूरभंज जिल्हा युनिटनेही राज्य सरकारवर निशाणा साधला. भाजपने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रपतींचा अवमान करण्यासाठी हे कृत्य झाल्याचा संशयही भाजपने उपस्थित केला.
संबंधित घटनेमध्ये, मयूरभंज जिल्ह्यातील भांजा सेना या स्थानिक संघटनेने सांगितले की, राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात वीज बिघाडासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई न झाल्यास ते बंदचे आयोजन करतील.
President Helicopter Photo Action on Pharmacist