मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ या वर्षी समाप्त होत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली नाही, तर देशाला नवे राष्ट्रपती मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी रणनीती तयार करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ला सध्या ९००० मतं कमी पडत आहेत. ही मतं भरून काढण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या खांद्यावर असेल. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपी आणि ओडिशामध्ये नवीन पटनायक यांच्या बीजेडीचे मतदार एनडीएच्या उमेदवाला मतदान करण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना जोरदार धक्का लागण्याची शक्यता आहे.
जून महिन्याच्या मध्यात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप नेतृत्वाने आतापासूनच यावर रणनीती तयार करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांच्या नावाबद्दल चर्चाही सुरू झाली आहे. एनडीएमध्ये सहभागी नसलेल्या पक्षांची मते जाणून घेण्यावरही काम सुरू झाले आहे. मे महिन्यात या पक्षांसोबत औपचारिक संवाद आणि संपर्क कार्यक्रम सुरू होणार आहे.
जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी भाजप प्रणीत एनडीएच्या उमेदवाराला आव्हान देण्यासाठी एक सामान्य उमेदवार मैदानात उतरवण्याबाबत चर्चा सुरू केली आहे. मेच्या सुरुवातीला राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी बैठक आयोजित करण्याची शक्यता आहे. तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवाराला पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, बिजू जनता दल (बीजेडी) ला सोबत आणण्यासाठी पक्षाच्या काही नेत्यांना नियुक्त केले आहे.
मोदी सरकारला बीजेडीकडून काही मुद्द्यावंर पाठिंबा मिळाला आहे. २०१९ मध्ये जम्मू-काश्मीर फेररचना विधेयक आणि तीन तलाक विधेयकासह महत्त्वाच्या विधेयकांच्या बाजूने बीजेडीने मतदान केले आहे. बीजेडीचे अध्यक्ष नवीन पटनायक यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी विरोधी पक्षांचे प्रयत्न सुरू असून, ते त्यामध्ये यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त करत आहेत. तसेच जगनमोहन रेड्डी यांची वायएसआरसीपी पक्षसुद्धा एनडीच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपतिपदासाठी १०,९८,९०३ मतांचे मूल्य असलेले लोकप्रतिनिधी मतदान करतील. यामध्ये बहुमतासाठी ५,४९,४५२ मतांची आवश्यकता आहे. एका खासदाराच्या मताचे मूल्य ७०८ आहे. देशातील ४१२० आमदारांमध्ये राज्याची लोकसंख्या आणि आमदारांच्या संख्येच्या आधारावर आमदारांच्या मताचे मूल्य वेगवेगळे असते. उत्तर प्रदेशच्या आमदारांचे सर्वाधिक २०८ मतांचे मूल्य आहे. बीजेडी आणि वायएसआरच्या पाठिंब्यामुळे बहुमताचा आकडा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमुळे विरोधी पक्षांची एकता किती आहे, हे दिसून येणार आहे. भाजपचा जोरदार मुकाबला करण्याची संधी विरोधी पक्ष शोधत आहेत. २०१७ रोजी झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर आतापर्यंत भाजपने एनडीएतील अकाली दल, शिवसेना, तेलुगू देसम पार्टी यांच्यासह इतरांना गमावले आहे. हा सरळ अंकगणिताचा खेळ असेल. यातून २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या एकतेची कसोटी लागणार आहे.