विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या सुरू आहे. दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविल्यानंतर आता तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला जात आहे. कोरोना प्रतिबंधक लस सध्या उपलब्ध असली तरी तिचा मोठा तुटवडा आहे. अद्याप ही लस १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे या सर्वांना त्याची मोठी प्रतिक्षा आहे. तसेच, लहान मुलांसाठी सध्या लस उपलब्ध नाही. मात्र, गर्भवतींनी ही लस घ्यावी की नाही, याबाबत मोठा संभ्रम आहे.
कोरोना प्रतिबंधक लस गर्भवती महिलांसाठी किती सुरक्षित आहे असाही एक प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे, यावर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी मोठे भाष्य केले आहे. गर्भवती महिलांनी तूर्तास तरी ही लस घेऊ नये, लसींच्या चाचण्यांमधून समोर आलेल्या आकडेवारीच्या आधारे डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी याबाबतची शिफारस केलेली नाही, असे पॉल यांनी स्पष्ट केले आहे. येत्या काही दिवसांत सरकारकडून यावर अधिक स्पष्टता दिली जाईल, तोपर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन डॉ. पॉल यांनी केले आहे.