नाशिक – गावठी कट्टा व जीवंत काडतुसे जवळ बाळगणार्‍या एका गुन्हेगारास अटक

नाशिक – गावठी कट्टा व जीवंत काडतुसे जवळ बाळगणार्‍या एका गुन्हेगारास सरकारवाडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक गावठी व तीन जीवंत काडतुसे जप्त केले आहेत. गुन्हेगाराने कोणाकडून कट्टा व काडतुसे खरेदी केली. तो कट्टा घेऊन कोठे जात होता, याचा तपास पोलीस करत आहेत. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दीपक प्रकाश जगताप (वय ३६, रा.मिलन लाईन क्वार्टर रोड, देवळाली कँम्प) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार बुधवारी (दि.९) रात्री रात्रगस्त घालत होते. रात्री १२.३० वाजेदरम्यान एक संशयित दुचाकीचालक गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पवार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित दुचाकीचालकास जलतरण सिग्नल येथे ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी व तीन जीवंत काडतुसे आढळून आले. त्याच्याजवळ विनापरवाना शस्त्र आढळून आल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार करत आहेत.