ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आघाडी आणि युती कायमच अस्वस्थ राहिलेल्या आहेत. कुठे तरी पाल चुकचुकते आणि दोन पक्षांमध्ये बिनसतं. महाविकास आघाडीच्या साडेतीन वर्षांच्या सत्तेत तिन्ही पक्षांमध्ये वारंवार भांडणं झाली, पण तरीही सांभाळून घेतले. शिंदे आणि फडणवीस यांनी देखील तसेच जमवून घेतले आहे. पण शिंदेंचे होमग्राऊंड ठाणे मात्र याला अपवाद ठरत आहे. याठिकाणी अद्याप दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये फारसं जमत नसल्याचे चित्र आहे.
ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला. याठिकाणी आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेली एक मोठी फळी आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन करताना हे सारे शिंदे यांच्या सोबत होते आणि आजही आहेत. पण तरीही भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत अद्याप त्यांचे सख्य जुळलेले नाही, असे दिसत आहे. ठाणे महानगरपालिका शिंदे गटाच्या ताब्यात आहे. त्यामुळे भाजपच्या कुठल्याही नेत्याने महानगरपालिकेवर आरोप केले की ते थेट शिंदे गटालाच लागू होतात. आणि दोन्ही पक्ष राज्यात एकत्रित सत्तेत आहेत. त्यामुळे त्याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसतात.
ठाण्यात भाजप आमदार संजय केळकर यांनी महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, अशी मागणी करून शिंदे गटाला अस्वस्थ करून सोडले आहे. केळकर यांनी आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. अधिकाऱ्यांना नेत्यांचे अभय असल्यामुळे हा आरोप थेट शिंदे गटालाच लागू होतो. या मागणीमुळे दोन्ही पक्षांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
भाजपचाच प्रतिसाद नाही
एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर ठाण्यातील शिंदे समर्थकांनी भाजपच्या लोकांसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. आजही ते प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गटातील काही नेते भाजपच्या लोकांसोबत जवळिक वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्यांना भाजपकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.
मुंबईत चौकशी, तर ठाण्यात का नाही?
ठाण्यात कंत्राटी कामांमध्ये मोठा घोळ आहे. शहरात विकासकामांच्या नावावर महापालिकेला लुटले जात आहे. अधिकारी आणि ठेकेदारांच्या विरोधात अनेकवेळा पुरावे देण्यात आले. तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही, असे केळकर यांनी आयुक्तांना सांगितले. त्याचवेळी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी कामांची चौकशी होऊ शकते, तर ठाण्यात का नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.
Politics Thane Shinde Group BJP Demands
Eknath Shinde Municipal Corporation