मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना आणि दसरा मेळावा यांचे अतूट नाते आहे. त्यानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक सहभागी होतात. यावर्षी ५ ऑक्टोबरला होणाऱ्या दसऱ्याला उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होणार आहे. त्याआधीच शिवाजी पार्क मैदानावर होणारा दसरा मेळावा प्रत्यक्षात कोणी घ्यायचा यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. सभेची परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. सध्या महापालिकेने परवानगी देण्याकडे पाठ फिरवल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या गोटातही हालचाली सुरू झाल्या आहेत.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात खऱ्या शिवसेनेसाठी जोरदार लढाई सुरू आहे. शिवसेनेचे ४० हून अधिक आमदार आणि १२ खासदार फोडून शिंदेंनी शिवसेनेवर दावा ठोकला आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालया आणि केंद्रीय निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. पक्षावर दावा करण्यासाठी दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे गोळा केली जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाबरोबरच जमिनीवरही दोन्ही गटात जोरदार संघर्ष सुरू आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या नजरा ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे लागल्या आहेत. शिवाजी पार्क मैदानावर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा न चुकता आयोजित केली जातो. पावसामुळे केवळ दोन-तीन वेळा हा मेळावा रद्द झाला आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कोणाची, असा वाद सुरू आहे. अशा स्थितीत यंदाच्या दसरा मेळाव्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. शिवसेनेने खबरदारी म्हणून सभेच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र महापालिकेने अद्याप परवानगी दिली नसल्याच्या बातम्या येत आहेत. याबाबत उद्धव ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र, त्यांना अद्याप परवानगी मिळाली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
भाजपचा पडद्याआडून पाठिंबा
राज्यात शिंदे-फडणवीस यांची सत्ता आहे. शिंदे गटाबरोबर भाजपच्याही निशाण्यावर उद्धव ठाकरे आहेत. शा स्थितीत शिवसेनेऐवजी शिंदे गटाला सभेची परवानगी मिळवून देण्यासाठी पडद्याआडून जोरदार चाचपणी सुरू आहे. शिवसेनेला परवानगी न मिळाल्यास एकनाथ शिंदे गट या मेळाव्यासाठी परवानगी घेणार आहे. परवानगी मिळाल्यास या बैठकीचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटे करणार की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यांच्यासोबत असतील, अशीही चर्चा सध्या सुरू आहे.
Politics Shivsena Dasara Melava Eknath Shinde Uddhav Thackeray
Shivaji Park Rebel Group BMC Permission